*सिरोंचा तालुक्यातून तेलंगणात वाळू तस्करी *दहा वर्षांतील सर्वात मोठी कारवाई

सिरोंचा तालुक्यातील गोदावरी नदीवरील वडदम व नगरम या दोन घाटांवर महसूल आणि पोलिस दलाच्या पथकाने रविवारी पहाटे छापा मारून तेलंगणात वाळू तस्करी करणारे ७८ ट्रक्स व ४ जेसीबी मशिन्स जप्त केल्याने हे तस्कर हादरले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या तस्करीची माहिती नागपुरातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्यावर ही कारवाई झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या दहा वर्षांतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.

चंद्रपूर जिल्ह्य़ातील अजयपूर येथे अवैध वाळू तस्करांनी वनाधिकाऱ्यांची बंदूक हिसकावून त्यांना बेदम मारहाण केल्याचे प्रकरण चर्चेत असतांनाच या दोन घाटांवरून गेल्या वष्रेभरापासून तेलंगणात अवैध वाळू तस्करी सुरू असल्याचे लोकसत्ता व इंडियन एक्स्प्रेसने समोर आणले होते. नागपूरच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास ही कोटय़वधींची तस्करी आणून दिली. त्यानंतर सिरोंचाचे उपविभागीय अधिकारी राममूर्ती व दक्षिण गडचिरोलीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजा यांना मंत्रालयातून थेट कारवाईचे आदेश मिळाले. त्यांनी पहाटे गोदावरीच्या वडदम व नगरम या दोन्ही घाटांवर एकाच वेळी छापा मारला. यावेळी नदीपात्रात ४ जेसीबीतून ट्रकमध्ये वाळू भरणे सुरू होते. घाटांवर छापा पडताच जेसीबी व ट्रकचालकांनी पळ काढला. यावेळी महसूल व पोलिस दलाने सर्व ट्रक ताब्यात घेतले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही जप्तीची कारवाई सुरूच होती.

वडदम हा वाळूघाट भाजप नेते व सिरोंचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व्यंकटेश्वर येनगंटी यांनी, तर नगरम घाट बंडम रेषेरेड्डी यांनी लिलावात घेतलेला आहे. येनगंटी हे पालकमंत्री अंबरीश आत्राम यांचे कट्टर समर्थक आहेत. वष्रेभरापासून हे सारे सुरू होते. विशेष म्हणजे, आतापर्यंत कोटय़वधींची वाळू या घाटावरून तेलंगणात नेल्यामुळे या भागातील रस्तेही उद्ध्वस्त झालेले आहेत.

दरम्यान, स्थानिक जिल्हा व पोलिस या तस्करीला मदत करत असल्यामुळेच नागपुरातील वरिष्ठ अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई झालेली आहे. या घाटाशी संबंधित लोक फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घाटमालकांवर कारवाई करू -राजा

दरम्यान, यासंदर्भात अतिरिक्त पोलिस अधीक्षक राजा म्हणाले की, पहाटे छापा मारून ७८ ट्रक्स आणि ४ जेसीबी मशिन्स जप्त केल्या आहेत. या २५ ट्रक वाळूने भरलेले होते. याप्रकरणी पंचनामा सुरू असून अद्याप कुणालाही अटक केलेली नाही. सर्व ट्रकचालक फरार झाले असून घाटमालकांवर कारवाई करणार आहे.

वाळू तस्करीचा पैसा निवडणुकीत

जिल्हा प्रशासनावर दबाव टाकून हा संपूर्ण प्रकार सुरू होता, असा आरोप या भागातील कॉंग्रेस नेते करत आहेत. दरम्यान, या तस्करीतील संपूर्ण पैसा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत वापरण्यात येत असल्याचा आरोप प्रचारादरम्यान कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत