निवडणुकीचा बंदोबस्त आटोपून परतत असलेल्या नगर पोलिसांच्या वाहनाला पुणे-नाशिक मार्गावरील क-हे घाटाच्या पायथ्याजवळ अपघात झाला. सकाळी नऊच्या सुमारास झालेल्या अपघातात चार पोलीस जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. सर्वावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहानवाज शेख व भास्कर देठे (दोघेही श्रीगोंदे ), राजेश दिनकर (श्रीरामपूर शहर) व वाहनचालक मनोज करडे (नगर मुख्यालय) अशी अपघातात जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी ते नाशिक जिल्ह्य़ात गेले होते. तेथील काम आटोपून नगरकडे परतत असताना अपघात झाला. कऱ्हे घाट उतरून आल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जाहिरातीच्या फलकावर त्यांची गाडी (क्रमांक एमएच १६-एन ५६७ ) आदळली. सगळ्यांच्या डोक्याला व हातापायाला गंभीर जखमा झाल्या. परिसरातील रहिवाशी व अन्य वाहनचालकांनी त्यांना मदत केली. सर्वाना तातडीने येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.