नोकरीसाठी अधिक गुण देणार; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती; प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर

व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसिताला शेतजमिनीची चार पट अधिक किंमत देण्याचा तसेच वनखात्यातील नोकरीसाठी कोअरमधील पुनर्वसिताला ७, तर बफर क्षेत्रातील पुनर्वसिताला ५ गुण अधिक देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली.

पूर्वी व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित कुटुंबाला केवळ १० लाख रुपये देण्यात येत होते. मात्र, राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारने यासंदर्भातील काही धोरणात्मक निर्णय घेतांना व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित कुटुंबाला शेतजमिनीच्या चार पट अधिक किंमत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे लोक आता स्वत: जमिनी देण्यास तयार झालेले आहेत. राज्यात ताडोबा, पेंच, नागझिरा-नवेगांव, सह्य़ाद्री, मेळघाट व बोर असे सहा व्याघ्र प्रकल्प असून, तेथील पुनर्वसितांना याचा लाभ निश्चितच मिळणार आहे. वनखात्यातील नोकरीत पुनर्वसिताला परीक्षेसाठी अधिकचे गुण देण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे. पुनर्वसित हा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील रहिवासी असेल तर त्याला ७, तर बफर क्षेत्रातील गावातील पुनर्वसित असेल तर ५ गुण अधिक दिले जाणार आहेत. त्यामुळे या गावातील लोकांना वनखाततील नोकरीत सहज सामावून घेणे शक्य होणार आहे. यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्र्यांकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात आलेला आहे. येत्या एक दोन दिवसात स्वाक्षरी होताच निर्णय लागू होईल, अशीही माहिती मुनगंटीवार यांनी दिली. तसेच वनविकास महामंडळाचे जंगल विकसित झाल्यावर वनखात्याकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.

बेपत्ता वाघिणीचा शोध

बेपत्ता वाघीण जिवंत आहे की मृत, याची निश्चित माहिती हैदराबादच्या प्रयोगशाळेतून डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतरच समोर येणार, अशीही माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली. सीबीआयने शोध सुरू केला आहे, स्थानिक पातळीवर समितीच्या माध्यमातून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. वनविकास महामंडळ व वनखात्यात वाघिणीच्या बछडय़ांचा मृत्यू आमच्या क्षेत्रात झालाच नाही, यावरून वाद सुरू होता. वनमंत्र्यांनी मात्र त्यांचा मृत्यू वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक १६६ मध्येच झाला असल्याची माहिती दिली.