प्रबोध देशपांडे

अकोला : शहरात करोनाचा कहर सुरू  असून, एकाच दिवसांत तब्बल आठ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. मृत्यूपूर्वी करोनाबाधितावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयातील डॉक्टर, वैद्याकीय कर्मचाऱ्यांसह एकूण आठ जणांना करोनाची लागण झाल्याचे आज, शनिवारी समोर आले. काल दाखल झालेल्या एका करोनाबाधित रुग्णाचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या ४० वर पोहोचली. त्यामुळे अकोल्याचा समावेश ‘रेड’ झोनमध्ये झाला आहे.

शहरात करोनाच्या वाढत्या संसर्गाने अकोलेकरांच्या चिंतेत भर पडली. आज प्राप्त झालेल्या ५८ अहवालात ५० अहवाल नकारात्मक, तर आठ अहवाल सकारात्मक आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ४० जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यातील चौघांचा मृत्यू व एकाने आत्महत्या केली. एकूण ११ जणांनी करोनावर मात केली. सद्यस्थितीत २४ जण उपचार घेत आहेत. काल, १ मे रोजी चार सकारात्मक अहवाल आले होते. त्यामध्ये २८ एप्रिलला मृत्यू झालेल्या खैर मोहम्मद प्लॉट येथील फळ विक्रेत्याचा अहवाल सकारात्मक आला. दरम्यान, काल सकारात्मक अहवाल आलेल्या ७९ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मध्यरात्री मृत्यू झाला.

आज, शनिवारी सकाळी ९.३० वाजता अहवाल प्राप्त झाले. त्यानुसार सहा जण सकारात्मक रुग्ण आढळले होते, तर सायंकाळी ५ वाजता प्राप्त अहवालात आणखी दोघांची भर पडली. त्यामुळे आज एकाच दिवसांत आठ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. सकाळी प्राप्त अहवालातील एक रुग्ण हा मोहम्मद अली मार्गावरील रहिवासी आहे, तर अन्य पाच हे अकोट फैल, मेहेर नगर, सुधीर कॉलनी, शिवाजी नगर, कमला नगर अशा पाच वेगवेगळ्या भागातील रहिवासी आहेत. हे पाचही जण एकाच खासगी रुग्णालयात काम करतात. त्यात एका डॉक्टरचाही समावेश आहे.

२८ एप्रिल रोजी अत्यवस्थ अवस्थेत दाखल महिला रुग्णाचा लगेचच मृत्यू झाला होता, त्या महिलेच्या संपर्कात हे पाचही जण आले होते. शासकीय रुग्णालयात येण्याआधी ती महिला या खासगी रुग्णालयात गेली होती. आज सायंकाळी सकारात्मक अहवाल आलेल्या रुग्णांत एका ३० वर्षीय महिलेचा समावेश असून अन्य एक ४० वर्षीय पुरुष आहे. ते फतेह चौक व बैदपूरा या भागातील रहिवासी आहेत. करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

सात दिवसांत २४ करोनाबाधित
अकोला शहरात गत सात दिवसांत तब्बल २४ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. या सात दिवसांमध्ये तीन रुग्णांचा मृत्युही झाला. २६ एप्रिलला एक, २८ रोजी पाच, २९ रोजी पाच, ३० एप्रिलला एक, १ मे रोजी चार व आज आठ असे २४ रुग्ण आढळून आले.
४१ अहवाल प्रलंबित आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ७७० नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ७२९ अहवाल आले असून एकूण ६८९ अहवाल नकारात्मक, तर ४० अहवाल सकारात्मक प्राप्त झाले आहेत. ४१ अहवाल प्रलंबित आहेत.