पालिका हद्दीत आजवर  ४३० जणांचा मृत्यू

वसई : वसई-विरार शहरांतील रुग्णसंख्येने २२ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. वाढत्या रुग्णसंख्येसोबतच शहरात मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. शहरात आजवर ४३० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नालासोपाऱ्यात मृतांचा आकडा सर्वाधिक आहे.

दिवसाला सरासरी १५० ते २०० रुग्ण आढळून येत आहेत, तर दिवसाला चार ते पाच रुग्ण दगावत आहे. रविवार, २७ सप्टेंबपर्यंत शहरांतील मृतांची संख्या ४३० इतकी झाली आहे. यात नालासोपाऱ्यातील १७८ जणांचा समावेश आहे. हे प्रमाण ४१.३९ टक्के इतके आहे. तर विरारमध्ये ११७ , वसईत १२४, नायगावमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यू झालेल्यामध्ये गंभीर आजार  आणि ५० वर्षांवरील नागरिकांचा समावेश आहे. यामुळे वसई, नायगाव व विरारपेक्षा नालासोपारा शहर अतिसंक्रमित आहे.

पूर्वेला १३२ मृत्यू

नालासोपारा पूर्वेला तुळींज रोड, संतोषभुवन, धानिवबाग, यासह इतर भागांत बैठय़ा चाळी व दाटीवाटी आहे. त्यामुळे याच भागातून मोठय़ा संख्येने रुग्ण सापडत आहेत, तर मृत्यूचेही प्रमाण अधिक आहे. नालासोपारा पूर्वेतील परिसरातून जवळपास १३२ जणांचा मृत्यू झाला आहे.