विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवत असून, दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. तापमानाने चाळिशी ओलांडली असून राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूरला ४७.६ नोंदविण्यात आले. अमरावतीत ४४.८, अकोला ४४.५, तर नागपुरात ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.  
विदर्भातील विविध जिल्ह्य़ात सरासरीच्या तुलनेत जास्त तापमान नोंदविण्यात आले. एप्रिल महिन्याच्या शेवटी वैशाख वणव्याने विदर्भाला अक्षरश: भाजून काढले आहे. अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. कडक उन्हामुळे चाकरमाने सोडले, तर अनेक लोक सकाळी अकरानंतर घरातच राहत आहेत. शहरातील रस्त्यांवर रविवारी शुकशुकाट होता. अनेक जण सायंकाळी सहानंतर घराबाहेर पडले. शहरातील शीतपेय विक्रेत्यांकडे गर्दी दिसू लागली आहे.
ग्रामीण आणि शहरातील काही भागात वीज जाण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे लोकांना असह्य़ उकाडाचा त्रास सहन करावा लागतो. विदर्भात ब्रह्मपुरी ४४.२, वर्धा ४३.२, बुलढाणा ४०, गोंदिया ४१.१, वाशीम ४२, यवतमाळ ४२.२ अंश सें. तापमान नोंदविले गेले. तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम झाला आहे. उन्हामुळे पक्ष्यांच्या संख्येत घट जाणवू लागली आहे. चिमण्या व कावळे आता अभावानेच दिसत आहेत. शहरातील शासकीय रुग्णालयांसह खासगी रुग्णालयातही उष्माघात व गॅस्ट्रोच्या रुग्णांची गर्दी वाढली आहे. .
विदर्भात उष्णतेची लाट आली असून राज्यात आज रविवारी सर्वाधिक ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद चंद्रपूर शहरात घेण्यात आली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतचे हे सर्वाधिक तापमान आहे. मे महिन्यात उन्हाचा पारा ४८ अंशापर्यंत जाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
* अमरावती ४४.८
* अकोला ४४. ५
* नागपूर ४४.४
* ब्रम्हपुरी ४४.२