संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या सासवड या जन्मगावी आगामी ८७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन रंगणार आहे. याबद्दलची औपचारिक घोषणा २५ मे रोजी साहित्य महामंडळाच्या बैठकीनंतर होणार असून यानिमित्ताने साहित्यिकांना ‘कऱ्हेचे पाणी’ चाखण्याची संधी लाभणार आहे.
आगामी संमेलनासाठी सासवड येथील आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड येथील साहित्यिकांच्या गटातर्फे अशी दोन निमंत्रणे साहित्य महामंडळाकडे आली आहेत. साहित्य महामंम्ळाचे कार्यालय पुण्यामध्ये आल्यामुळे आगामी तीन वर्षांच्या साहित्य संमेलनाविषयीचे निर्णय घेण्याचे अधिकार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडे आले आहेत. साहित्य महामंडळाच्या घटनेनुसार संमेलनासाठी नोंदणीकृत संघटनेकडून आलेले निमंत्रण हेच ग्राह्य़ धरले जाते. या कसोटीवर पिंपरी-चिंचवड येथील निमंत्रण हे संस्थात्मक पातळीवरचे नसल्यामुळे बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सासवड हाच एक पर्याय साहित्य महामंडळासमोर असल्याने हे संमेलन सासवड येथेच होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानतर्फे सासवड येथे १३ ऑगस्ट या आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनी गेली काही वर्षे आचार्य अत्रे साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे १३ जून या अत्रे यांच्या स्मृतिदिनी साहित्य, पत्रकारिता आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांना आचार्य अत्रे पुरस्काराने गौरविण्यात येते. एका संमेलनास उपस्थित असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तत्कालीन कार्याध्यक्ष डॉ. गं. ना. जोगळेकर यांनी या कार्याची प्रशंसा करून भविष्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन प्रतिष्ठानला देण्याचा मनोदय जाहीर केला होता. जोगळेकर यांनी दिलेले हे वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आता साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांवर आली आहे.