महापालिकेचा नगररचनाकार विश्वनाथ दहे याला गुरुवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केल्यानंतर आता पथकाने या घटनेत आणखी कोणी अधिकारी सहभागी आहेत का याची चौकशी सुरू केली आहे. पथकाच्या तपासी अधिका-यांनी न्यायालयात ही बाब स्पष्ट केली. दरम्यान, दहे याच्या नगरमधील फ्लॅटमध्ये ९ लाख ४ हजार ५४५ रुपयांची रोकड आढळली. ती जप्त करण्यात आली. त्याच्या औरंगाबाद व मानवत (परभणी) येथील घरांची झडती सुरू करण्यात आली आहे. तो अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त झालेला नव्हता. दहे याला मंगळवापर्यंत (दि. १८) कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
दहे याला काल रात्री दहाच्या सुमारास नगरमधील इस्टेट एजंट सचिन कटारिया यांच्याकडून टीडीआर मंजूर करण्यासाठी ४ लाख रुपयांची लाच घेताना, पथकाच्या अधिका-यांनी पाइपलाइन रस्त्यावरील श्रीराम चौक ते शीलाविहार दरम्यान असलेल्या हॉटेल देवभोग नजीकच्या वासुदेव अपार्टमेंटमध्ये अटक केली. पथकाचे येथील उपाधीक्षक अशोक देवरे, निरीक्षक राजेंद्र माळी व विजय मुर्तडक, हवालदार वसंत वाव्हळ, खराडे, नितीन दराडे, राजेंद्र सावंत, प्रमोद जरे, रवींद्र पांडे, श्रीपादसिंह ठाकूर, अंबादास हुलगे यांच्या पथकाने अटक केली.
कटारिया व संतोष गुगळे हे दोघे एकत्रित इस्टेट एजंट म्हणून काम करतात. केडगाव बायपासजवळ, मनपा हद्दीत त्यांची २ हेक्टर ३६ आर जागा आहे. त्यावर ‘पिकनिक झोन’चे आरक्षण आहे. त्या बदल्यात त्यांना सव्वादोन लाख चौरस फूट क्षेत्राचा टीडीआर मिळणार आहे, त्याच्या मंजुरीसाठी दहे याने लाचेची मागणी केली होती.
शुक्रवारी दुपारी दहे याला पथकाने विशेष न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्यापुढे हजर केले. जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील व उपअधीक्षक देवरे यांनी युक्तिवाद केला. लाचेची मागणी करताना दहे याचा आवाज रेकॉर्ड करण्यात आला आहे. त्याच्या आवाजाचे नमुने तपासायचे आहेत. घरात आढळलेल्या ९ लाखाच्या रकमेचा स्रोत शोधायचा आहे, दहे याने इतरांकडूनही अशीच रक्कम स्वीकारली असावी, त्याचा शोध घ्यायचा आहे, या घटनेत इतरही अधिकारी सहभागी आहेत का, याचा शोध घ्यावयाचा आहे. दहे याने आणखी कोठे अवैध स्थावर व जंगम मालमत्ता निर्माण केली याचा शोध घ्यायचा आहे, यासाठी त्याला कोठडी देण्याची मागणी त्यांनी केली. दहेच्या वतीने वकील अनंत फडणीस यांनी युक्तिवाद केला.
५० लाखांवरून १८ लाखांवर तडजोड
टीडीआरच्या मंजुरीसाठी नगररचनाकार दहे याने सचिन कटारिया यांच्याकडे सुरुवातीला ५० लाख रुपयांची मागणी केली होती, नंतर २४ लाख रु., पुन्हा १८ लाख रुपयांवर तडजोड झाली. काल रात्री कटारिया व संतोष गुगळे हे दोघे दहे याच्या फ्लॅटवर गेले. येथे दहे एकटाच बसला होता. तेथे दहे याची लाचेची मागणी रेकॉर्ड करण्यात आली. १८ लाखांपैकी प्लॅस्टिकच्या पिशवीत आणलेली ४ लाख रुपये लाचेची रक्कम कटारिया यांनी दहेजवळ दिली, दहे याने ती टेबलवर ठेवण्यास सांगितले. रक्कम ठेवून कटारिया बाहेर गेले, काही वेळातच परत आले व त्यांनी दहे यांना चुकून ५ लाख दिले गेले, असे सांगितले. दहे याने नाही, मी मोजून घेतले, चारच लाख आहेत, असे म्हणत कपाटातून रोकड काढून दाखवली, तेवढय़ात पथकाने छापा टाकला.
नगरमध्येच ठाण
नगररचनाकार दहे हा वर्ग १ दर्जाचा अधिकारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो नगरमध्येच ठाण मांडून बसला आहे. मनपापूर्वी राज्य सरकारच्या नगरच्याच कार्यालयात व त्यापूर्वीही पालिका असताना तो येथेच नियुक्त होता. लाचेची मागणी करणारा दहे याचा आवाज रेकॉर्ड करण्यात आला आहे, त्यात त्याने मागणी करताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पदाचे नाव घेत त्यांनाही वाटा द्यावा लागतो, असे म्हटले आहे, त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग याची कशाप्रकारे चौकशी करणार याबद्दल उत्सुकता व्यक्त केली जाते.