पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्यानंतर सध्या सुरू असलेल्या परतीच्या दमदार पावसामुळे जिल्हय़ात रब्बी हंगामाच्या आशा वाढल्या आहेत. गेल्या वर्षांच्या तुलनेत या क्षेत्रात यंदा तब्बल ५० टक्के वाढीची शक्यता गृहीत धरून कृषी विभागाने तब्बल ९ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पिकांच्या लागवडीचे नियोजन केले आहे. सर्वसाधारण क्षेत्रापेक्षाही हे क्षेत्र अधिक असून तब्बल ११७ टक्के क्षेत्रावर रब्बीचे नियोजन आहे.
गेल्या दहा दिवसांपासून जिल्हय़ात सर्वत्र कमीअधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून, बहुतांश भागात दमदार पाऊस सुरू आहे. खरीप हंगाम वाया गेल्याच्या पाश्र्वभूमीवर रब्बीच्या आशा या पावसाने वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी गेल्या काही वर्षांत प्रथमच नदी, ओढे-नाले वाहिले असून या भागात पेरण्यांसाठी वापशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
परतीच्या पावसामुळेच जिल्हा रब्बीचा म्हणून ओळखला जातो. यंदा हे क्षेत्र आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे. जिल्हय़ात ७ लाख ८७ हजार ९४० हे रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र असून, गेल्या वर्षी त्यात मोठीच घट झाली होती. यातील ६ लाख ६३ हजार हेक्टर क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या झाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा या क्षेत्रात तब्बल ५० टक्के वाढीची अपपेक्षा व्यक्त होते. त्यामुळेच तब्बल ९ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. हे प्रमाण १२० टक्के आहे. यातही ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. शिवाय त्यातही तब्बल लाखभर हेक्टर क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. हे सर्वसाधारण क्षेत्र ५ लाख २० हजार हेक्टर असून गेल्या वर्षी त्यातील ४ लाख ४३ हजार हेक्टर क्षेत्रावरच ही पेरणी झाली होती. यंदा तब्बल ६ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले असून, ११७ टक्के क्षेत्रावर ही लागवड होईल, असा अंदाज जिल्हा कृषी विभागानेच व्यक्त केला आहे.
जिल्हय़ाला परतीच्या पावसाने चांगलाच हात दिला असला तरी पाण्याचे दुर्भिक्ष्य अजूनही संपलेले नाही. जिल्हय़ात अजूनही मोठय़ा पावसाची अपेक्षा असून येत्या काळात तो झाला तरच हे नियोजन कामी येईल. कारण परतीचा पाऊस समाधानकारक सुरू असला तरी त्याचा खरिपाच्या पिकांना कोणताच लाभ होऊ शकलेला नाही. खरिपाचे जवळजवळ शंभर टक्के क्षेत्र पावसाअभावी बाधित झाले आहे. जिल्हय़ात यंदा ४ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाचे नियोजन करण्यात आले होते. प्रत्यक्षात ३ लाख ३६ हजार ६६२ हेक्टर क्षेत्रावरच या पेरण्या झाल्या. त्याही पावसाअभावी शंभर टक्के बाधित झाल्याने हे उत्पादन कमालीचे घटणार आहे. शिवाय परतीच्या पावसावर खरिपाच्या दुबार पेरणीचीही आता मुळीच शक्यता नसल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.