अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू

पालघर : पालघर जिल्ह्यात आजवर ६० पेक्षा अधिक सौर कृषी पंप कार्यान्वित झाले असून ६७ शेतकरी सौर पंपांच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना सौर कृषी पंपासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नव्याने सुरू केली आहे.

महावितरणच्या पालघर विभागात ११९ शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत मंजुरी मिळाली असून त्यापैकी ५२ शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे पंप बसवण्यात आले आहेत. या योजनेत ६७ शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित असून त्यापैकी २० शेतकऱ्यांनी आवश्यक पैसे जमा न करणे तर १४ शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने कोटेशन दिले नसल्याने प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. महावितरणने तीन टप्प्यांमध्ये सौर कृषी पंप योजना राबवण्याचे जाहीर केले असून पहिल्या टप्प्यात २५ हजार , दुसऱ्या टप्प्यात ५० हजार तर तिसऱ्या टप्प्यात पुन्हा २५ हजार सौर कृषी पंप देण्याची योजना बनवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सौर कृषी पंपासाठी अर्ज स्वीकारणे स्थगित करण्यात आले होते. मात्र या आठवड्यापासून अशा योजनेत सहभागी होण्यासाठी पुन्हा ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत तीन अश्वमेध हॉर्स पॉवर डीसी सौर पंपासाठी एक लाख ६५ हजार ५९४ रुपये दर निश्चित करण्यात आला असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी १६ हजार ५६० रुपये तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी आठ हजार२८० रुपयांचा भरणा करणे आवश्यक आहे. पाच अश्वमेध हॉर्सपॉवर सौर पंपासाठी खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना २४ हजार ७१० तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना १२ हजार ३५५ रुपयांचा भरणा करावयाचा आहे.  दरम्यान  प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेल्या अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत महावितरणच्या पालघर विभागात १८ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता.