लोकसत्ता खास प्रतिनिधी
औरंगाबाद शहरातील सगळी दुकानं आज उघडत होती. प्रत्येकाचा कामाचा उत्साह दिसत होता. नाकाला रुमाल बांधून दुकानदार व्यवहाराला सुरुवात करत होते त्या वेळी शुक्रवारी सकाळी पुन्हा ५९ नव्या करोना रुग्णांची भर पडली होती. एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला. शहरातील करोनाबाधित मृत्यूची संख्या आता ९३ वर पोहचली. गेल्या ७२ दिवसानंतर शुक्रवारी सकाळी दुकाने उघडली. ऑटो रिक्षावाल्यांनी चौकात रांगा लावल्या. कपड्यांची, इलेक्ट्रीकल उपकरणाची दुकानेही उघडली. त्यामुळे एका बाजूला व्यावसायाला चालना देताना करोना रुग्णांची संख्याही चढत्या क्रमाची राहिली.

शासकीय वैद्याकीय महाविद्याालय आणि रुग्णालयामध्ये शहरातील नेहरू नगर, कटकट गेट येथे राहणाऱ्या ३० वर्षीय करोनाबाधित गरोदर महिलेचा ४ जून रोजी दुपारी २ वाजता मृत्यू झाला. या ३० वर्षीय गरोदर महिलेस २८ मे रोजी घाटीमध्ये दुपारी ४ वाजता दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी या महिलेची प्रसूती झाली. या महिलेचा करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आला. मात्र, प्रसुतीनंतर तिच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत गेले व मूत्रपिंडाचे काम कमी झाले. त्यामुळे त्यांच्यावर डायलिसीसचे उपचार केले जात होते. अतिदक्षता कक्षात उपचार चालू असताना ४ जून रोजी या महिलेचा मृत्यू झाला.

प्रसुतीनंतर झालेल्या मुलीस मात्र करोनाची बाधा नाही. बाळाचे वजन २.४ किलो भरल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आता या घाटीत ७२ जणांना तर तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण २० व जिल्हा रुग्णालयामध्ये एका जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ९३ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८२८ झाली आहे यापैकी ११२६ रुग्ण बरे होऊन स्वगृही गेले आहेत.

शहरातील विविध भागात शुक्रवारी रुग्णसंख्या वाढत गेली. भारतमाता नगर , इंदिरानगर न्यू बायजीपुरा , न्यू कॉलनी, रोशन गेट, भावसिंगपुरा, त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी , बेगमपुरा , चिश्तिया कॉलनी , फाझलपुरा , रेहमानिया कॉलनी , गांधी नगर , जुना मोंढा, भवानी नगर , शुभश्री कॉलनी, एन सहा , संत ज्ञानेश्वार नगर, एन ९ , आयोध्या नगर, एन सात , बुडीलेन , मयूर नगर, एन अकरा ,विजय नगर, गारखेडा, सईदा कॉलनी , गणेश कॉलनी , एसटी कॉलनी, फाजलपुरा , रोशन गेट परिसर , भवानी नगर, जुना मोंढा , जवाहर कॉलनी या भागात रुग्ण आढळले. हा विषाणू शहरभर पसरला आहे. काही प्रतिबंधित भागात पुन्हा रुग्ण आढळून आले आहेत.