पोलिसांची भरधाव टाटा सुमो झाडावर आदळून वाशीम-अमरावती मार्गावर कामरगावजवळ झालेल्या अपघातात पोलीस निरीक्षकांसह सहा जण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त कारवाईसाठी अमरावती येथून वाशीमला दोन पोलीस अधिकारी व सात कर्मचारी आले होते. कारवाईची प्रक्रिया मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पूर्ण करून परतीच्या प्रवासाला निघताना बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांच्या गाडीला अपघात झाला.
अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल राजनकर, सतीश मवाळ, जमादार राजेंद्र देशमुख, प्रवीण भुजाडे, अनिल खेडकर, अविनाश कोकाटे, अशोक साळुंखे, विशाल हरणे व वाहनचालक प्रमोद काळे हे टाटा सुमोने (एम.एच. २७, एए १९९) मंगळवारी वाशीममध्ये कारवाईसाठी आले होते. वाशीम व अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे मंगळवार रात्री उशिरापर्यंत कारवाई पार पाडली. अमरावतीचे पथक बुधवारी पहाटे परतीच्या प्रवासाला निघाले. कामरगाववरून अमरावतीकडे जाताना दोन किलोमीटर अंतरावरील रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका निंबाच्या झाडावर पोलिसांची टाटा सुमो आदळली. या धडकेने गाडीचा चुराडा झाला. पोलीस निरीक्षक अनिल राजनकर, सतीश मवाळ, जमादार राजेंद्र देशमुख, प्रवीण भुजाडे, अनिल खेडकर आणि सुमोचा चालक प्रमोद काळे हे सहा जण जागीच ठार झाले, तर अविनाश कोकाटे, अशोक साळुंखे व विशाल हरणे हे या अपघातात गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अरविंद साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली. दुपारी बाराच्या सुमारास अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बिपीन बिहारी आणि वाशीमचे पोलीस अधीक्षक सुधीर हिरेमठ यांनीही घटनास्थळी भेट दिली. कामरगाव व परिसरातील शेकडो नागरिक घटनास्थळी आले होते. या घटनेने अमरावती विभागातील पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.