शेतक-यांच्या शेतीमालाला थेट बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने कृषी खाते व आत्मा प्रकल्प यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘धान्य व फळे महोत्सव-२०१४’मध्ये पहिल्याच दिवशी धान्य व फळांची सुमारे ७० लाखांची विक्री झाली. महोत्सवात शेतक-यांचे १६० स्टॉल उभारण्यात आले आहेत.
सावेडीतील जॉगिंग पार्कवर (प्रोफेसर कॉलनी) हा धान्य व फळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ज्या शेतक-यांकडे स्वच्छ धान्य उपलब्ध आहे, त्यांनी महोत्सवात अजूनही सहभागी व्हावे, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक शिवाजीराव आमले यांनी केले आहे.
महोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी कृषिभूषण मच्छिंद्र घोलप, बापूसाहेब गाडे, सुदाम सरोदे व विष्णू जरे, पत्रकार बाळ बोठे, शेतीनिष्ठ शेतकरी सचिन जगताप, अविनाश जगताप यांचा गौरव करण्यात आला. महोत्सवात अकोल्यातील अदिवासी शेतक-यांनी पिकवलेला सेंद्रिय काळाभात, जिरवेल, इंद्रायणी तांदूळ याला ग्राहकांनी पसंती दिली. राहाता व कोपरगाव येथील शेतक-यांनी गहू विक्रीस आणला आहे. कर्जत, जामखेड, पाथर्डी व शेवगाव येथील शेतक-यांनी मालदंडी ज्वारी व कडधान्ये आणली आहेत. आत्मा अंतर्गत महिला बचतगटांनी राजुरी कंदी पेढे, ओली हळद, हळद पावडर, आवळा कँडी, टरबूज, खरबूज, संत्री, चिकू, पपई, आंबा आदी चवदार ताजी फळे आणली आहेत. महोत्सवात विविध ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांचेही स्टॉल आहेत. खवय्यांनी त्यालाही पसंती दिली आहे.
पहिल्याच दिवशी ग्राहकांनी महोत्सवास चांगला प्रतिसाद दिला. सायंकाळनंतर गर्दीचा ओघ वाढला होता. कृषी अधिकारी व कर्मचा-यांनी महोत्सवासाठी सहकार्य केले. महोत्सव आणखी तीन दिवस आहे.