भाजपसह अपक्षांनी शक्तिप्रदर्शनाने आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. लातूर ग्रामीणमधून रमेश कराड, निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, तर उदगीरमधून आमदार सुधाकर भालेराव यांच्या अर्जाचा यात समावेश आहे. औसा मतदारसंघातून भाजपचे पाशा पटेल यांनी साधेपणाने अर्ज दाखल केला.
दरम्यान, शुक्रवारी जिल्हय़ातील ६ मतदारसंघांतून तब्बल ४७ जणांनी ७३ उमेदवारी अर्ज दाखल केले. आतापर्यंत जिल्हय़ात एकूण ७७ जणांनी ११९ अर्ज दाखल केले. लातूर शहर मतदारसंघातून तब्बल २७ उमेदवारांनी ४०, तर सर्वात कमी अहमदपूर मतदारसंघातून ७ उमेदवारांनी १२ अर्ज दाखल केले.
लातूर ग्रामीणमधून कराड यांनी शक्तिप्रदर्शन केले. अर्ज दाखल करतेवेळी खासदार सुनील गायकवाड, प्रदीप पाटील खंडापूरकर, नवनाथ भोसले आदी उपस्थित होते. मनसेचे संतोष नागरगोजे यांनीही अर्ज दाखल केला. लातूर शहर मतदारसंघातून भाजपचे बळवंत जाधव यांच्यासह १७ जणांनी अर्ज दाखल केले. निलंग्यातून संभाजी पाटील निलंगेकर, िलबणमहाराज रेशमे, अशोक पाटील, शोभा बेंजरगे यांनी अर्ज दाखल केले.
शिवसेनेची जिल्हय़ातील उमेदवारांची यादी उद्या (शनिवारी) जाहीर होईल. मनसेने पाच मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. लातूर शहर मतदारसंघात त्यांनी उमेदवार जाहीर केला नाही. भाजपकडून लातूर शहरासाठी शैलेश लाहोटी, तर अहमदपूरमध्ये गणेश हाके उद्या अर्ज दाखल करणार आहेत.