पावसाची ओढ कायम असलीतरी अचानक ढग दाटून येऊन होणारी जोरदार पर्जन्यवृष्टी दैना उडवत आहे. कोयना शिवसागर वगळता जवळपास सर्वच धरणे भरून वाहिली आहेत. कोयना धरणाचा पाणीसाठा कित्येक दिवस ९५ टीएमसीदरम्यान कायम राहिला आहे. पावसाने उघडीप घेतल्याने सध्या कण्हेर वगळता जवळपास सर्वच धरणांतून  पाण्याचा विसर्ग बंद आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख १२ प्रकल्पांत २४५ टीएमसी म्हणजेच ९५ टक्के पाणीसाठा आहे. या प्रकल्पात असलेला पाणीसाठा टीएमसीमध्ये तर कंसात त्याची टक्केवारी- कोयना ९४.२ (८९.०८), वारणा ३३.४७६ (९७), दूधगंगा २३.८९ (९४), राधानगरी ८.१६ (९८), धोम १२.३२ (९१.२७), कण्हेर ९.७४ (९६.४४), उरमोडी ९.५१ (९५.२४), तारळी ५.०६ (८६.५०), धोम-बलकवडी ३.८२ (९३.४९) तर, सातारा जिल्ह्याच्या हद्दीवरील पुणे जिल्ह्यातील वीर ९.४१ (१००), नीरा देवघर ११.५३ (९८.२९), भाटघर २२.९८ (९७.७९).  
यंदा गतवर्षीपेक्षा कमी पाऊस झाला असला तरी तो सरासरीपेक्षा जादाच असल्याने ठिकठिकाणचे प्रकल्प क्षमतेने भरून वाहिले आहेत. कोयना शिवसागरात चालू हंगामातील ८७ दिवसांत ९३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. आज दिवसभरात कोयना धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात १७ एकूण ४,१३९, नवजा विभागात ३३ एकूण ५,०५३ तर, महाबळेश्वर विभागात ४८ एकूण ३,८७५ मि.मी. पावसाची नोंद आहे. हा सरासरी पाऊस ४,३५५.६६ मि.मी. नोंदला गेला आहे. गतवर्षी हाच सरासरी पाऊस ५,५५३.३० मि.मी. पावसाची नोंद होताना धरणाचा पाणीसाठा १०२.२ टीएमसी म्हणजेच ९७ टक्के नोंदला गेला होता.