चोरांशी लढा देताना चालत्या ट्रेनमधून पडल्याने ३२ वर्षीय महिला जखमी झाली आहे. चोर महिलेची हॅण्डबॅग चोरण्याचा प्रयत्न करत होते. ट्रेन वसई स्थानकावर पोहोचत असताना ही घटना घडली. सीमा डोहरे असं या महिलेचं नाव आहे. चोर फरार असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. सीमा डोहरे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर सर्जरी करणं आवश्यक होतं. पण पैसे नसल्या कारणाने कुटुंबीयांना दोन दिवस वाट पहावी लागली.

सीमा लोणावळ्याच्या रहिवासी असून आपल्या १२ वर्षीय मुलगा आणि १० वर्षीय मुलीसोबत ग्वाल्हेरला एका कौटुंबिक लग्नासाठी चालल्या होत्या. पुणे-ग्वाल्हेर एक्स्प्रेसने जात असताना त्यांच्यासोबत हा प्रकार घडला. त्यांनी लोणावळाहून ट्रेन पकडली होती आणि एस-६ कोचमधून प्रवास करत होते.

सीमा यांचे पती संतोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ती सात नबंर बर्थमध्ये झोपली होती. पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास सीमाला कोणीतरी आपल्या मुलीची हॅण्डबॅग खेचत असल्याचं लक्षात आलं. मुलगी सहा नंबरच्या बर्थवर झोपली होती. मुलीची हॅण्डबॅग खेचून आरोपी फरार झाला. सीमा त्याचा पाठलाग करण्याचा विचार करत होती तितक्यात तिची हॅण्डबॅगही खेचत असल्याचं लक्षात आलं. सीमाने हॅण्डबॅग परत मिळवण्याचा प्रयत्न केला पण तोल गेल्याने चालत्या ट्रेनमधून खाली पडली’.

सीमाचे पती संतोष कंत्राटी कामगार म्हणून लोणावळ्यात काम करतात. हॅण्डबॅगमध्ये मौल्यवान वस्तूंसहित मोबाइल आणि रोख रक्कम होती अशी माहिती संतोष यांनी दिली असून एकूण २४ हजारांचं नुकसान झालं आहे. सीमा ट्रेनमधून पडल्यानंतर त्यांच्या मुली जोरजोरात रडू लागल्या. यामुळे काही प्रवाशांना जाग आली आणि त्याने चेन खेचत ट्रेन थांबवली. ट्रेन गार्डला यासंबंधी कळवण्यात आलं. प्रवाशांच्या मदतीने गार्डने सीमा यांनी जखमी अवस्थेत केबिनमध्ये नेलं आणि बोईसरला स्टेशन मास्तरकडे सोपवलं. यावेळी सीमा यांच्या मुलींनी एका प्रवाशाच्या फोनवरुन वडिलांशी संपर्क साधला आणि घटनेची माहिती दिली. सीमा यांनी बोईसरमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

संतोष यांनी सांगितल्यानुसार, जेव्हा आपण रुग्णालयात पोहोचलो तेव्हा सीमाला प्राथमिक उपचारही देण्यात आले नव्हते. पाय फ्रॅक्चर झाला असतानाही फक्त बॅण्डेज लावण्यात आलं होतं. डॉक्टरांकडे तक्रार केली असता आपल्याकडे अद्यावत सुविधा नसल्याचं सांगण्यात आलं. पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जा असा सल्ला त्यांनी दिला. रुग्णालयाकडे अॅम्ब्युलन्स नसल्या कारणाने संतोष यांनी टॅक्सी करत पत्नीला लोणावळ्यातील खासगी रुग्णालयात नेलं.

सीमा यांच्यावर तात्काळ सर्जरी करणं गरजेचं होतं. पण पैसे नसल्याने दोन दिवस वाट पहावी लागली. अखेर संतोष यांनी आपल्या कुटुंब आणि मित्रांकडून पैसे उधार घेतले आणि सर्जरी करण्यात आली. आपण अधिकाऱ्यांना उपचारासाठी पैसे नसल्याचं सांगितलं, तेव्हा त्यांनी ही तुमची समस्या असल्याचं सांगत हात झटकले असा आरोप संतोष यांनी केली आहे. दरम्यान जीआरपी चोराचा शोध घेत असून लवकरच अटक करु असा विश्वास व्यक्त केला आहे.