महिला मतदारांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे सांगत शिवसेनेचे नेते आदेश बांदेकर यांनी रविवारी परभणीत रोड शो केला. पार्वती मंगल कार्यालयात शहरातील महिलांशी संवाददेखील साधला.
 प्रचारासाठी रविवारी सकाळी अभिनेते आदेश बांदेकर परभणीत दाखल झाले. वसमत रस्त्यावरील जागृती कॉलनीतील हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर त्यांनी फेरी काढली. रामकृष्णनगर, विष्णूनगर, आनंदनगर, शिवाजीनगर, लोकमान्यनगर या परिसरात उघडय़ा जीपमधून बांदेकर यांनी मतदारांशी संवाद  साधला. बांदेकर यांना पाहण्यासाठी रस्त्यावर महिलांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी बांदेकर यांचे महिलांनी औक्षण केले. या निमित्ताने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली. यावेळी शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. शिवाजी दळणर आदी उपस्थित होते.