नांदेडमध्ये माहूर-किनवट महामार्गावर नखेगाव फाटयाजवळ महामंडळाच्या बसने सिमेंट वाहतूक करणार्‍या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात ४३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचाराकरिता माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

किनवट-औरंगाबद बस (एम.एच.20.बीएल.3134) बुधवारी सकाळी ११.४५ वाजता किनवटकडे जात असताना माहूरजवळील नखेगाव फाट्याजवळ ट्रकला (टि.एस.01.युएल.1799) धडक दिली. धुळीमुळे बस चालकाला ट्रक दिसला नसल्यामुळे धडक दिली. या अपघातात बसमधील ४३ प्रवासी जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात बसच्या पुढील दोन्ही काचा फुटल्या आहेत.

माहूर येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.व्ही.एन.भोसले, डॉ.अभिजीत अंबेकर यांनी उपचार केले. रुग्णालयात माहूर एसटी आगारप्रमुख व्ही.टी.धुतमल, स्थानक प्रमुख व्ही.एन.जावळे, डी.एस.कोकणे, देशमुख, करपे यांनी भेट देऊन जखमी प्रवाशांना तातडीची मदत केली.