रेती साठवणुकीचे खड्डे जेसीबी मशीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त

पालघर : तालुक्यातील चहाडे परिसरातील वैतरणा खाडी पात्रात होणाऱ्या वाळू उत्खननावर सफाळेचे मंडळ अधिकारी वसंत बारवे यांनी मंगळवारी कारवाई केली. तांदूळवाडी, लालठाणे आणि खडकोली रेती बंदरातील वाळू साठविण्यासाठी तयार केलेले खड्डे जेसीबी मशीनच्या साहाय्याने उद्ध्वस्त केले.

जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला पेव फुटले आहे. समुद्रकिनाऱ्यासह नदीपात्रात बेसुमार उत्खनन सुरू आहे. आठवडाभरापूर्वी मनोर मंडळ अधिकारी यांनी अवैध वाळू उत्खननावरच्या कारवाई केल्यानंतर लगेच ही कारवाई केली आहे. चहाडे हद्दीतील वैतरणा खाडी पात्रात अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याच्या तक्रारी सफाळे मंडळ अधिकारी वसंत बारवे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह तांदूळवाडी, लालठाणे आणि खडकोली रेती बंदरात छापा टाकला. या वेळी अवैधरीत्या उत्खनन केलेली रेती साठवणुकीसाठी सिमेंटच्या रिकाम्या गोणी वापरून तात्पुरता स्वरूपात खड्डे तयार केल्याचे आढळून आले. त्यानंतर जेसीबी मशीनच्या साहाय्याने रेती साठवणुकीचे खड्डे नष्ट करण्यात आले.

वैतरणा खाडी पात्रात मोठ्या प्रमाणात सक्शन पंपाच्या साहाय्याने वाळूचे उत्खनन केले जाते. वाळू माफियांनी वैतरणा खाडीचे किनारे मोठ्या प्रमाणात पोखरले आहेत. त्यामुळे खाडीचे पात्ररुंद झाले आहे. किनारे पोखरल्याने शेकडो एकर जमिनी खचल्या आहेत. यामुळे शेतजमिनी उद्ध्वस्त होत आहेत.

महसूल विभागाने खड्डे बुजून कारवाई केल्याचे दाखविले असले तरी किनाऱ्यावर नांगरून ठेवलेल्या बोटी व सक्शन पंप यावर कोणतीही कारवाई न केल्याने संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे अशा बोटी व पंपावर कारवाईची मागणी नागरिक करीत आहेत. वाळू माफियांच्या कारवाईला कायमचा पायंबद बसावा यासाठी मागणी होत आहे.