डाळी, खाद्य तेलबिया व खाद्यतेल यांचे भाव कडाडल्याने त्यांच्या साठय़ांवर राज्य सरकारने काल, सोमवारपासून निर्बंध लागू केल्यानंतर साठेबाजांवर धाडी टाकण्यासाठी जिल्हय़ात २२ पथके जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या सूचनेनुसार स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांना लगेच ठोक विक्रेत्यांची दुकाने, गोदामे, साठे करण्याची ठिकाणे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या तीन-चार दिवसांत केवळ हीच मोहीम राबवण्याचे व मर्यादेपेक्षा अधिक साठा असणाऱ्यांवर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत.
जिल्हा पुरवठा अधिकारी जितेंद्र वाघ यांनी ही माहिती दिली. प्रत्येक तालुक्यांच्या तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली १५, प्रांताधिकाऱ्यांची प्रत्येकी ७ व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे जिल्हास्तरीय पथक निर्माण करण्यात आले आहे. तहसीलदारांना त्यांच्या तालुक्याऐवजी अन्य तालुक्यात धाडी टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाला त्यांच्या कार्यक्षेत्रात कारवाई करण्याचे आदेश आहेत. या पथकांत पुरवठा विभागाच्या अन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांच्या कार्यवाहीचे अहवाल रोज राज्य सरकारला धाडण्याचेही आदेश आहेत. महापालिका, नगरपालिका, ग्रामीण भागात किती साठय़ांची मर्यादा ठरवून दिली आहे, याची माहिती नगर आडत बाजार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आज पुरवठा विभागाने दिली.
दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात डाळी व खाद्यतेलांचे भाव एकाएकी आकाशाला भिडल्याने नागरिक हैराण तसेच त्रस्त झाले आहेत. विविध संघटना आंदोलनेही करू लागले आहेत. त्यामुळे राज्य सरकार अखेर जागे झाले व साठय़ांवर मर्यादा आणली. यापूर्वी राज्यात डाळी, खाद्यतेलबिया व खाद्यतेले यांच्या साठय़ांवर मर्यादा नव्हती, कोणताही व्यापारी याचा कितीही साठा करू शकत होता. परिणामी, मोठय़ा प्रमाणावर साठेबाजी झाली.
घाऊक व किरकोळ डाळ विक्रेत्यांसाठी महापालिका, अ वर्ग नगरपालिका क्षेत्र व इतर ठिकाणांसाठी ३ हजार ५०० व २०० क्विंटल, २ हजार ५०० व १५० क्विंटल, १ हजार ५०० व १५० क्विंटल. खाद्यतेलबियांसाठी (टरफले असलेल्या शेंगादाण्यासह) घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसाठी महापालिका, अ वर्ग पालिका व इतर ठिकाणांसाठी २ हजार व २०० क्विंटल, ८०० व १०० क्विंटल (शेंगदाणा किंवा बियांसाठी या प्रमाणाच्या ७५ टक्के साठा मर्यादा), खाद्यतेलांसाठी महापालिका क्षेत्रातील घाऊक विक्रेत्यांसाठी १ हजार क्विंटल, किरकोळसाठी ४० क्विंटल, इतर ठिकाणी अनुक्रमे ३०० व २० क्विंटल, याप्रमाणे साठा मर्यादा ठरवून देण्यात आली आहे.
वर्षभर निर्बंध लागू
सध्याचा ठरवून दिलेला साठा निर्बंध ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत लागू राहणार आहे. यापूर्वी एप्रिल २०१५ रोजी डाळी व खाद्यतेलांच्या साठय़ांवरील निर्बंध उठवण्याचे आदेश रद्द करण्यात आले आहेत. डाळी, खाद्यतेल, तेलबिया यांच्या साठवणुकीवर सरकारने सन २०१०मध्ये निश्चित केल्याप्रमाणे निर्बंध राहणार आहेत.