सिन्नर तालुक्यातील सावतामाळी नगर येथे शंभर एकरवर शासकीय कृषी महाविद्यालय व प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास राज्य शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे.  खा. हेमंत गोडसे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ऑगस्ट २०१४ मध्ये मुंबई येथे गोडसे यांनी भेट घेऊन नाशिक परिसरात हे महाविद्यालय होणे कसे गरजेचे आहे, यासंदर्भात चर्चा करून चव्हाण यांना मागणीचे निवेदनही दिले. नाशिक परिसरात कृषी महाविद्यालय व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी याआधी काही प्रयत्न करण्यात आले होते. मात्र पाणी व जागेअभावी हा प्रस्ताव तयारच झाला नव्हता. गोडसे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील पांढुर्ली, सावतामाळी नगर येथील ३०० एकर गायरानपैकी काही क्षेत्र कृषी महाविद्यालय व प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रासाठी उपयोगी पडू शकते हे हेरले. शिवाय येथे मुबलक पाणी असल्याने तसेच नाशिकपासून अवघ्या १५ किलोमीटरवर असल्याने येथेच हे महाविद्यालय व्हावे हे संबंधितांच्या लक्षात आणून देत याबाबतचा प्रस्ताव तयार करून त्यास मंजुरी देण्याची मागणी गोडसे यांनी केल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत प्रस्ताव तयार करणाचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात युतीची सत्ता येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री एकनाथ खडसे यांची गोडसे यांनी शासकीय कृषी महाविद्यालय व प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रासंदर्भात भेट घेऊन नाशिकमध्येच हे महाविद्यालय होण्यासंदर्भात पत्र देवून चर्चा केली. अखेर शासकीय कृषी महाविद्यालय व प्रक्रिया प्रशिक्षण केंद्रास तत्त्वत: मंजुरी राज्य शासनाने दिली .
कृषी महाविद्यालयामुळे नाशिक परिसरातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे ओढा वाढेल, अशी अपेक्षा गोडसे यांनी व्यक्त केली. शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी ६५६९.७० लाख रुपये खर्च येणार असून त्यापैकी इमारतीच्या बांधकामासाठी कमाल २५०० लाख रुपयांच्या खर्चास कृषी परिषदेने तत्त्वत: मान्यता देवून शासनाकडे प्रस्तावाची शिफारस केलीे. गोडसे यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने महाविद्यालय व प्रक्रिया केंद्रास तत्त्वत: मंजुरी दिली आहे.