दुसरे लग्न करण्यासाठी अहमदनगरमध्ये एका तरुणाने चक्क एड्स झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, पत्नीला याबाबत शंका आली आणि पतीचा हा बनाव उघड झाला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार अहमदनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला पत्नीकडून घटस्फोट हवा होता. संबंधित दाम्पत्य २०१३ पासून विभक्त राहत असून त्यांना एक मुलगाही आहे. पत्नीला घटस्फोट देऊन दुसरं लग्न करण्याचा त्या तरुणाचा प्रयत्न होता. घटस्फोटासाठी त्याने भन्नाट शक्कल लढवली. त्याने स्वत:ला एड्स झाल्याचे पत्नीला सांगितले. पुरावा म्हणून एका ख्यातनाम रुग्णालयातील रिपोर्टही दाखवले. सुरुवातीला पत्नीने त्याच्यावर विश्वास ठेवला.
‘माझ्यामुळे पत्नीलाही एचआयव्ही बाधा होऊ शकते आणि शेवटी याचा परिणाम मुलाच्या भवितव्यावरही होऊ शकतो’, असे त्याने पत्नीच्या वडिलांना सांगितले. तिला घटस्फोटासाठी अर्ज करण्यास सांगा, असा सल्लाही त्याने दिला. यानुसार पत्नीने पतीशी घटस्फोट घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला. पत्नी आणि मुलाच्या नावाने विमा काढून देतो, असेही त्याने सांगितले. पत्नी आणि तिच्या माहेरच्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने विमा काढला, पण त्याचे हप्ते भरलेच नाही.
संशय आल्यानंतर पत्नीने पतीकडे उपचारांबाबत विचारणा केली. मात्र, पतीकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पत्नीने पोलिसांकडे धाव घेतली. कोतवाली पोलिसांनी महिलेचा पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 6, 2018 11:07 am