अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये येत्या शैक्षणिक सत्रासाठी १८ हजार अतिरिक्त जागांना मंजुरी दिली आहे. येत्या जून-जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक सत्राकरीता पदवी अभ्यासक्रमाच्या १० हजार आणि पदविका अभ्यासक्रमाच्या ८ हजार अतिरिक्त जागांना आहेत. मात्र, याचा अर्थ या सर्व जागांची भर पडणार आहे असा नाही. अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांअभावी अभ्यासक्रम बंद करण्याची परवानगी मागितल्याने पदवी व पदविका अभ्यासक्रमातील जवळजवळ इतक्याच जागा कमी झाल्या आहेत. त्याचप्रमाणे काही महाविद्यालये आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्याने एआयसीटीईने काही अभ्यासक्रम बंद पाडण्यास भाग पाडले.

महाविद्यालयांनी सध्याची प्रवेश क्षमता वाढवून मागण्यासाठी केलेले अर्ज एआयसीटीईने मंजूर केल्यामुळे पदवी अभ्यासक्रमाच्या १० हजार, तर पदविका अभ्यासक्रमाच्या ८ हजार जागांची भर पडली आहे. काही नवी महाविद्यालये येत्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होण्यासही हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे, असे तंत्रशिक्षण संचालक सुभाष महाजन यांनी सांगितले. एआयसीटीईच्या निर्देशाप्रमाणे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे सर्व प्रवेश जूनपूर्वी पूर्ण केले जातील. एमटी-सीईटी परीक्षेचे निकाल ५ जूनला जाहीर केल्यानंतर आम्ही लगेच केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (कॅप) सुरू करू,अशी माहिती त्यांनी दिली.
विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाल्यामुळे काही महाविद्यालयांनी माहिती तंत्रज्ञानासारख्या शाखा बंद करण्यासाठी अर्ज केले असल्याने त्या जागा कमी झाल्या. राज्यात सध्या ३६४ महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या सुमारे दीड लाख जागा आहेत. यापैकी तब्बल ४० हजार जागा गेल्या वर्षी रिकाम्या राहिल्या होत्या. गेल्या वर्षीही तंत्रशिक्षण परिषदेने राज्यात ११ नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना परवानगी दिली होती.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ झाल्यामुळे याही वर्षी फार मोठय़ा संख्येत जागा रिक्त राहण्याची शक्यता असल्याचे तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितले. नवी अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्यासाठी संपूर्ण देशभरातून एआयसीटीईकडे १८० अर्ज आले होते. जवळजवळ २ लाख ८० हजार विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी प्रवेशासाठी एमटी-सीईटी परीक्षा दिली असली, तरी त्यापैकी निम्मे विद्यार्थीही प्रत्यक्षात राज्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतील असे वाटत नसल्याचे महाजन यांनी सांगितले.
आवश्यक त्या निकषांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल एआयसीटीईने १०१ संस्थांना नोटिसा पाठवल्या आहेत. यात महाराष्ट्रातील २३, आंध्र प्रदेशातील २६, उत्तर प्रदेशातील १२ आणि तामिळनाडूतील ६ महाविद्यालयांचा समावेश आहे. याच कारणासाठी त्यांनी नागपूर विद्यापीठातील एका महाविद्यालयासह अनेक महाविद्यालयांमधील प्रवेशही थांबवले आहेत. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे असलेला ओढा कमी झाल्याचे आकडेवारीही सांगते. काही वर्षांपूर्वी एआयसीटीईकडे नव्या महाविद्यालयांसाठी २ हजार अर्ज आले होते. ही संख्या २०११ साली ६६९, तर गेल्या वर्षी १८० इतकी होती. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, हरयाणा व छत्तीसगडसह अनेक राज्यांनी सध्याच्या महाविद्यालयांमध्ये अनेक जागा रिकाम्या राहात असल्याने नव्या अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन महाविद्यालयांना मंजुरी देऊ नये, अशी विनंती केली होती.