शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. कोल्हापुरमधील नेसरी येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी शिवसेनेसहित भाजपावर सडेतोड टीका केली. ‘भाजपसोबत सत्तेत बसायचं, कॅबिनेटच्या बैठकीत सर्व प्रश्नांना मान्यता दयायची आणि एखादा प्रश्न निर्माण झाला की विरोध करायचा…अरे शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे…त्याचं तोंड इकडे की तिकडे कळत नाही’, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन पुकारलं असून नेसरी येथील जाहीर सभेने दुस-या दिवसाची सुरुवात केली. सभेत बोलताना अजित पवार यांनी भाजपासोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर जोरदार टिका केली. अजित पवारांनी शिवसेनेसहित भाजपाचाही चांगलाच समाचार घेतला.

‘साडेतीन वर्ष भाजपा आणि शिवसेना यांचा भोंगळ कारभार सुरु आहे. भाजपा आणि शिवसेना ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेनेला शेतीतलं काय कळतं…या शिवसेनेचे नेते मुंबईत राहतात…त्यांच्या नेत्यांची एक गुंठेही शेती नाही त्यांना शेती काय कळणार’, अशी खरमरीत टिका अजित पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता केली.

‘हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारे असते तर हे सरकार शेतकऱ्यांसोबत असे वागले नसते. या सरकारची इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघू शकतो, परंतु या सरकारची काही करण्याची इच्छाशक्तीच नसल्याचा’, आरोप अजित पवार यांनी यावेळी केला.

‘लोकसभा-विधानसभा काही महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आणि आमदार निवडून द्या. नाही तुमचे प्रश्न सोडवले तर पवारांची अवलाद सांगणार नाही’, असंही अजित पवार यावेळी बोलले आहेत.