आज होणाऱ्या मेळावा, बैठकीबाबत चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्य़ाचे प्रभारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या, रविवारी सोलापुरात येऊन पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. गेल्या सहा-सात वर्षांत पवार यांनी सोलापुरात पक्षांतर्गत बाबींकडे लक्ष घातल्यानंतर मोठय़ा प्रमाणात गटबाजी निर्माण होऊन त्यात पक्ष खिळखिळा झाला आहे. या पाश्र्वभूमीवर ते पक्षाची घडी पुन्हा कशी बसवितात, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष वेधले आहे.
सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात २००९ पर्यंत माजी उपमुख्यमंत्री, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा दबदबा होता. त्यांच्या ताब्यात जिल्हा परिषदेसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा दूध उत्पादक संघ आदी महत्त्वाच्या संस्था होत्या. परंतु खासदार मोहिते-पाटील यांचे वर्चस्व कमी करण्याच्या हेतूने अजित पवार यांनी मोहितेविरोधक निर्माण करून त्यांना मोठे केले. यात माढय़ाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू संजय शिंदे, पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे पुतणे, विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक आदींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. राज्यात अजित पवार यांची सत्ता असताना सोलापूर जिल्ह्य़ाच्या राजकारणात संजय शिंदे हेच महत्त्वाची निर्णायक भूमिका बजावत असत. मोहिते-पाटील विरोध हेच त्यांचे प्रमुख भांडवल ठरले होते. यातूनच जिल्हा परिषदेत मोहिते-पाटील यांच्या समर्थक उमेदवाराचा सभापतिपदाच्या निवडणुकीत घडवून आणलेला पराभव, जिल्हा परिषदेतील अध्यक्षासह इतर पदाधिकाऱ्यांच्या दालनांतून सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमा हटविण्याचा खटाटोप आदी प्रकार घडले. निर्णय प्रक्रियेत मोहिते-पाटील यांना दूर ठेवण्यात आले होते. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कमालीची गटबाजी वाढली आणि त्यात विस्कळीतपणा आला होता. त्याचा फटका जिल्ह्य़ाच्या विकासावरही झाला होता.
या पाश्र्वभूमीवर अजित पवार यांनी ज्यांना मोठे केले ते संजय शिंदे व प्रशांत परिचारक हे पुढे राष्ट्रवादी सोडून इतर पक्षात गेले. यापैकी परिचारक हे गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करून महायुतीकडून निवडून गेले होते. महायुतीत दाखल होण्यापूर्वी परिचारक हे सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्षपद सांभाळत. दूध संघ राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असूनही महायुतीचे परिचारक हे अद्यापि अध्यक्षपदावर कायम कसे? त्यांना अजित पवार यांचाच आशीर्वाद आहे काय, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
दरम्यान, उद्या रविवारी सकाळी हुतात्मा स्मृतिमंदिरात अजित पवार हे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी सिद्धेश्वर मार्केट यार्डाजवळील वि. गु. शिवदारे सांस्कृतिक सभागृहात पवार हे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतील.