अकोट तालुक्यातील मोहाळा येथे भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी काँग्रेसचे पराभूत उमेदवार हिदायत पटेल यांच्यासह १०जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीला या हत्याप्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. पण पोलीस तपासात वैयक्तिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचे उघड झाल्याचे समजते. या घटनेबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

मोहाळा येथे २४ मे रोजी सायंकाळच्या दरम्यान भाजपाच्या अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी मतीनखान शेरखान पटेल (वय ४८) यांच्यासोबत गावातीलच काँग्रेस पक्षाशी संबंधित पटेल गटाच्या लोकांचा वादविवाद झाला होता. यानंतर झालेल्या हल्ल्यात मतीनखान यांचा मृत्यू झाला. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने परिसरात तणाव होता.

अखेर या प्रकरणात फिर्यादीने दिलेल्या जबाबामुळे राजकीय वादातून हत्या झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुमताज खानने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, या घटनेमागे लहान मुलांच्या भांडणाचे कारण असून या कारणावरून हिदायत पटेलसह दहा जणांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने घरात घुसून मारहाण केली. या आधारे पोलिसांनी हिदायत उल्ला खान, बरकत उल्ला खान पटेल, इम्रान उल्ला खान पटेल, शफीक उल्ला खान पटेल, फारुक उल्ला खान पटेल, शोएब उल्ला खान पटेल, फरीद उल्ला खान पटेल, रहेमत उल्ला खान पटेल, रफत उल्ला खान पटेल, इस्ताक उल्ला खान पटेल, अतहर उल्ला खान पटेल यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.