अलिबाग खोपोली राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी शेकापने केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या चौपदरीकरणाला सध्या सुरुवात झाली असून अलिबाग ते वडखळ याही मार्गाचे चौपदरीकरण तातडीने सुरू करावे,अशी मागणी शेकाप आमदार जयंत पाटील आणि मीनाक्षी पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.
रायगड जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून झपाटय़ाने विकसित होत आहे. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे जिल्ह्य़ात वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. पण त्या तुलनेत इथल्या पायाभूत सुविधा विकसित झालेल्या नाहीत. जिल्ह्य़ातील रस्त्यांवर  याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा होण्यास सुरुवात झाली आहे.
अलिबाग-पेण-खोपोली राज्यमार्ग क्रमांक ८८ हा जिल्ह्य़ातील मुख्य रस्ता आहे. शिवाय अलिबाग आणि मुरुड या दोन पर्यटन केंद्रांना जोडणारा हा रस्ता आहे. जिल्ह्य़ाचे मुख्यालय अलिबागला आहे. इस्पात, आरसीएफ, एचपीसीएल, निटको यांसारखे मोठे उद्योग याच मार्गावर आहेत. त्यामुळे या मार्गाचे चौपदरीकरण होणे गरजेचे आहे. जिल्ह्य़ात सध्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे या महामार्गाला जोडणाऱ्या अलिबाग-खोपोली मार्गाचे चौपदरीकरणही तातडीने सुरू केले जावे, अशी मागणी शेकापने राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे केली आहे.