अनधिकृत फेरीवाले आणि भाजीवाल्यांविरोधात अलिबाग नगरपालिकेन धडक कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे अलिबाग शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. शहराचे बकालीकरण रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मोहिमेचे अलिबागकरांनी स्वागत केल आहे. मात्र आंग्रे समाधी परिसरातील भाजीवाले आणि फेरीवाल्यांवर कारवाईची मागणी केली जाते आहे.
शहरातील रस्त्यावर जागोजागी उभ्या राहणाऱ्या फेरीवाल्यांमुळे आणि रस्त्यावर पथारी पसरून बसणाऱ्या भाजीवाल्यांमुळे अलिबाग शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. या फेरीवाल्यांमुळे शहरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. ही वाहतूककोंडी सोडवा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी वेळोवेळी केली होती. ही बाब लक्षात घेऊन बेशिस्त फेरीवाल्यांविरोधात आणि भाजीवाल्यांविरोधात नगरपालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे. शहरातील आंबेडकर चौक ते महावीर चौक रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. मुळात हा रस्ता हा ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र तरीही भाजीवाले, फळविक्रेते आणि फूलवाल्यांनी रस्त्यावरच पथारी पसरून व्यवसाय थाटले होते. यामुळे या रस्त्यावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत होती. एस. टी. स्थानकातून बाहेर येणाऱ्या बसेसला मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत होते. वाहतूककोंडीमुळे अपघातही होत होते.
 अखेर आता शहरातील फेरीवाल्यांना शिस्त लावण्यासाठी या कारवाईला सुरुवात केल्याचे अलिबागच्या नगराध्यक्षा नमिता नाईक यांनी सांगितले. या कारवाईपूर्वी भाजीवाले आणि फेरीवाल्यांची बैठक घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर साार्वजनिक वाचनालय, जुन्या मच्छीमार्केटच्या जागेत फेरीवाल्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. शहरातील नागरिकांच्या मागणीनुसार ही कारवाई सुरू केल्याचेही नाईक यांनी स्पष्ट केले.
तर आता ही कारवाई थांबणार नसल्याचे मुख्याधिकारी कल्पिता पिंपळे यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील विविध भागांत बसणाऱ्या भाजीवाले आणि फेरीवाल्यांवरही कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. आंबेडकर चौक ते महावीर चौक परिसरातील वाहनांच्या बेकायदेशीर पार्किंगचा प्रश्नही नगरपालिकेन हाती घेतला असून लवकरच तारखेनुसार पार्किंगची सुविधा करून दिली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान नगरपालिकेने सुरू केलेल्या या कारवाईचे अलिबागकरांनी स्वागत केले आहे. मात्र केवळ एस.टी. स्टॅण्डसमोरील मुख्य रस्त्यावरच कारवाई न करता शहरातील आंग्रे समाधी ते बाजारपेठ रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवरही कारवाई करा, अशी मागणी केली जाते आहे. आंग्रे समाधी स्थळाला लागून काही भाजीविक्रेत्यांनी दुकाने थाटली आहे. समाधी स्थळाच्या भिंतीला प्लास्टिक बांधून समाधीचे विद्रूपीकरण सुरू केले आहे. जागा-सातबारावर चढवल्यासारखे भाजीवाले इथे जागा बळकावून बसले आहेत. यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.