सुहास बिऱ्हाडे

वसईतील उपाहारगृहांकडून वापरलेल्या खाद्यतेलाची पदपथावरील विक्रेत्यांना सर्रास विक्री

खाद्यतेलाचा पुनर्वापर रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन सज्ज झाली असली तरी वसई-विरार शहरातील बहुतांश ठिकाणी खाद्यतेलाचा पुनर्वापर होत आहे. अनेक उपाहारगृहे कारवाई होऊ नये यासाठी वापरलेले खाद्यतेल पदपथांवरील विक्रेत्यांना विकत असल्याची धक्कादायक बाब उघड आली आहे. या निकृष्ट तेलामुळे पदपथांवरील विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ विकत घेणाऱ्या खवय्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

खाद्यतेलाचा वापर होण्यापूर्वी त्याचा टीपीएम (टोटल पोलाल मटेरियल) सात एवढा असतो. तो तीनपेक्षा जास्त वेळा उकळल्याने २५पर्यंत पोहोचतो. असे तेल आरोग्ययाला अपायकारक असते. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने तीनपेक्षा जास्त वेळा उकळलेले खाद्यतेल वापरण्यास बंदी घातली आहे. मात्र वसईत जागोजागी वारंवार उकळलेले खाद्यतेल वापरले जात आहे. पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेत तर मोठय़ा उपाहारगृहांमधून वापरलेले तेल विकत घेऊन पदार्थ तळत असल्याची बाब समोर आली आहे. मोठय़ा उपाहारगृहांमध्ये जे तेल वापरले जाते, ते तेल उपाहारगृहचालक छोटय़ा विक्रेत्यांना ३० ते ३५ रुपयांना विकत आहे. या वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाचा कुठलाही अंकुश नसल्याचे खुद्द पोलिसांनी सांगितले.

पालघर जिल्ह्य़ात अन्न व औषध प्रशासनाचे एकच कार्यालय असून त्यांच्याकडे संपूर्ण पालघर जिल्ह्य़ाची जबाबदारी आहे. वापरलेल्या तेलाचा खाद्यपदार्थ तळण्यासाठी वापर होत असल्यास कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले. हा निर्णय १ मार्चपासून लागू झाला आहे. जर कुणी तेलाचा पुनर्वापर करत असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे दराडे यांनी सांगितले.

खाद्यतेलापासून बायोडिझेल

वापरेल्या खाद्यतेलापासून बायोडिझेल बनविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यासाठी काही कंपन्यांशी करार केला आहे. आयरिश बायोएनर्जी ही कंपनी त्यापैकी एक असून त्यांनी पारस एण्टरप्राईझेस या कंपनीला उपाहारगृहातील तेल गोळा करण्याचे कंत्राट दिले आहे. ही कंपनी वसईतील हॉटेलचालकांशी संपर्क साधून त्यांच्याकडील वापरलेले खाद्यतेल विकत घेत आहे. यावेळी अनेक उपाहारगृहांतील वापरलेले तेल पदपथावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विकले जात असल्याचा आरोप कंपनीचे संचालक रोशन नाईक यांनी केला.

वसई-विरारमधील अनेक ठिकाणी उपाहारगृहांवर कारवाई केली असून भेसळयुक्त पदार्थ कसे बनवले जातात, ते उघडकीस आणले आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा ठिकाणी कारावई करणे गरजेचे आहे

– विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई

अतिवापरलेले तेल आरोग्याला अपायकारक आहे. या तेलाच्या वापरावर बंदी घातली असून त्यासाठी जनजागृती करत आहोत. पालघरमधील विभागाला कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत.

– डॉ.पल्लवी दराडे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन