अंबरनाथमध्ये पोलीस अधिकाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. ४५ वर्षीय राजेंद्र पांढरे दुचाकीवरुन जात असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि खाली कोसळले. यावेळी तिथे पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्याने रस्त्यातच सीपीआर देत राजेंद्र पांढरे यांचा जीव वाचवला.

पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ११ जुलैच्या रात्री उल्हास जाधव गस्तीवर होते. पोलीस व्हॅनमधून गस्त घालत असतानाच कल्याण-बदलापूर रोडवर त्यांना एक दुचाकीस्वार खाली पडल्याचं दिसलं. यावेळी त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. तेव्हा दुचाकीस्वावाला ह्रदयविकाराचा झटका आलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

उल्हास जाधव यांनी तात्काळ सीपीआर दिला आणि राजेंद्र पांढरे यांचा जीव वाचवला. यानंतर त्यांना छाया रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दरम्यान देवदुताप्रमाणे धावून आलेल्या उल्हास जाधव यांचं कौतुक होत आहे.