आदित्य डेंटल महाविद्यालयात तक्रार करणाऱ्या मुलींना संचालकांनी डांबून ठेवल्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध होताच गुरुवारी सकाळीच महाविद्यालयाकडे शिवसेना, मनसे व भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी धाव घेतली. विद्यार्थिनींनी संस्थाचालकांकडून होत असलेली दमदाटी आणि गैरसोयीबद्दल स्पष्टपणे भूमिका मांडून इतर ठिकाणी प्रवेश घेण्यास महाविद्यालयाने स्थलांतर पत्र व इतर कागदपत्रे देण्याची मागणी केली. प्रशासनाने पोलिसांना बोलविल्याने महाविद्यालयात एकच गोंधळ उडाला. अखेर महाविद्यालय प्रशासनाने मुलींचे प्रवेश शुल्क व कागदपत्रे देण्याची तयारी दर्शवली.  या मुलींनी जिल्हाधिकारी व पोलिसांकडे महाविद्यालयाच्या संचालिका आदिती सारडा या दमदाटी करत असल्याची तक्रार केली.येथील काँग्रेसचे नेते व्यावसायिक सुभाष सारडा यांचे परळी रस्त्यावर आदित्य इंजिनिअरिंग व दंत महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या बहुतांश मुली या इतर जिल्ह्य़ातील आहेत.