गेल्या पाच महिन्यांपासून मानधनच मिळत नसल्याने विटलेल्या सुमित्रा सवंडकर या जिंतूर तालुक्यातील बोर्डी येथील अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केल्याचे मंगळवारी उघड झाले. मानधनाप्रमाणेच रजिस्टरसाठी लावण्यात येणारा तगादा आणि केलेल्या कामाचे कौतुक नसल्याने आपण हा निर्णय घेत आहोत, असे तिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. या घटनेने अंगणवाडी सेविकांमध्ये संताप धगधगत असून बुधवारी सरकारविरोधी निदर्शने केली जाणार आहेत.

सवंडकर या नागनगाव येथील अंगणवाडीत कार्यरत होत्या. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी जुने २००८ पासूनचे रजिस्टर द्या, असा तगादा लावल्याने आपण आत्महत्या करत आहोत, असे त्यांनी नमूद केले आहे. पाच महिन्यांपासून पगार नाही, झेरॉक्स कुठून आणायच्या, रजिस्टरसाठी पैसे कुठून आणायचे, दररोज अंगणवाडीच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी वीस रुपये कुठून आणायचे, सरकारने अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांचे राहिलेले मानधन द्यावे, अशी अपेक्षाही सवंडकर यांनी या पत्रात नमूद केली आहे.

दहा वर्षांचे रजिस्टर मागणाऱ्या आणि त्यासाठी तगादा लावणाऱ्या  अधिकाऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाच गुन्हा दाखल करण्याची मागणी अंगणवाडी सेविकांच्या नेत्या माधुरी क्षीरसागर यांनी केली आहे.