चंदीगड येथे शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील जवानाला मानवंदना देण्यासाठी अहमदनगरहून परळीकडे निघालेल्या वाहनाला अपघात झाल्याने नऊ जवान जखमी झाले. ही घटना आज (रविवार) दुपारी दीडच्या सुमारास संगमपाटीजवळ घडली. जखमींपैकी दोघांचे पाय फ्रॅक्चर असल्याचे समजते.

अधिक माहिती अशी, चंदीगड येथे कर्तव्यावर असलेले परळीचे भूमीपूत्र सुभेदार बाबुराव शिंदे यांचा शनिवारी रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्यावर रविवारी सांयकाळी परळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांना मानवंदना देण्यासाठी नगर येथील आर्म्ड फोर्सचे १५ जवान नगरहून परळीकडे निघाले होते.

आर्म्ड फोर्सच्या ट्रकमधून (क्र. १४ सी १००२९८) हे सर्व जवान परळीकडे निघाले होते. परळी-बीड मार्गावरील दिंद्रूड नजीकच्या संगम फाट्याजवळ आले असताना अचानक वाहनाचे ब्रेक निकामी झाले. चालकाने वाहन रस्त्याच्या खाली घेऊन उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ताबा सुटल्याने वाहन रस्त्यालगत असलेल्या खडड्यात जाऊन उलटले. या अपघातात ९ जवान जखमी झाले. यात दोघांचे पाय फ्रॅक्चर असून ७ जवान किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने बीड आणि माजलगावच्या रूग्णालयात हलवले. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.