कलादालन पाहायचे तर शहरात जायला हवे असा समज असलेल्या गतिमान युगात शिराळा तालुक्यातील चार-पाच हजार लोकवस्तीच्या चिंचोलीतील कलादालन सध्या सहलीचे ठिकाण बनले आहे. कला शिक्षक अशोक जाधव यांनी डोंगरदऱ्यात, रानावनात आढळलेल्या लाकूडफाटय़ाला वेगळी नजाकत देऊन कोरलेली काष्ठशिल्पे, पिंपळपानावर रेखाटलेल्या प्रतिमा पाहण्यासाठी शहरात कोंडलेली पिढीही भान हरपून जात आहे.

कला शिक्षक जाधव यांचा परंपरागत शेतीचा व्यवसाय, मात्र कलेवर जिवापाड प्रेम. या प्रेमातूनच कलेचे शिक्षण घेत आज कला शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांच्यातील कलाकार त्यांनी जिवंत ठेवला. चार-पाच हजार लोकवस्ती असलेल्या चिंचोली गावातच स्वत:च्या घरात कलादालन सुरू केले. कलादालनात रस्त्याच्या कडेला आढळलेल्या लाकूडफाटय़ा बरोबरच झाडांच्या फांद्या आणून त्यातून वेगवेगळे पक्षी, प्राणी चितारले. कलेला सामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हे कलादालन खुले केले आहे.

या कलादालनात मांडण्यात आलेली काष्ठशिल्पे ही सामान्य माणसालाही मंत्रमुग्ध करण्याची किमया साधतात. काष्ठशिल्पे सहज संवाद साधत असताना अशी फांदी आमच्याही शेतात असताना आम्हाला कसा बोध झाला नाही, असा प्रश्नही ही कला रसिकांच्या मनात निर्माण करते.

पपळाच्या नाजूक जाळीदार पानावर रेखाटलेली लोकोत्तर व्यक्तींची अप्रतिम रेखाचित्रे तर भान हरपणारीच ठरत आहेत. अगदी, महात्मा गांधी, नेहरूंपासून सुभाषबाबूंपर्यंत स्वातंत्र्यलढय़ातील नेते तर आहेतच, पण त्याचबरोबर सध्या सिक्कीमचे राज्यपाल म्हणून कार्यरत असणारे श्रीनिवास पाटीलही या पपळाच्या पानावर रेखाटले आहेत. याचबरोबर या कलादालनात पाहण्यासाठी देश-विदेशातील व विविध राज्यांतील वेगवेगळय़ा दुर्मिळ चित्रांच्या हजारो काडय़ापेटींचा संग्रह, लोकनृत्य, पाश्चात्त्य नृत्य यांच्या कात्रणाचा संग्रहही विद्यार्थ्यांना वेगळी माहिती देणारा आहे. असे हे माहितीपूर्ण कलादालन पाहण्यासाठी आता शाळकरी मुलांबरोबरच पर्यटकांचे पाय या खेडय़ाकडे वळू लागले आहेत.