01 March 2021

News Flash

संधी मिळाली तर गडकरींच्या विरोधात निवडणूक लढवू : आशिष देशमुख

त्याचबरोबर आपल्या काटोल विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून भाजपाने ती जिंकून दाखवावी असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

लोकसभेसाठी जर संधी मिळाली तर नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असे भाजपातून नुकतेच बाहेर पडलेले आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलेले डॉ. आशिष देशमुख यांनी म्हटले आहे. नागपूरची जागा गडकरींसाठी अनुकूल नाही त्यामुळे या ठिकाणी आपला विजय होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आपल्या काटोल विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून भाजपाने ती जिंकून दाखवावी असे आव्हानही त्यांनी भाजपाला दिले आहे. शनिवारी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी देशमुख म्हणाले, २ ऑक्टोबर रोजी आपण आमदारपदाचा राजीनामा दिला तसेच राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यानंतरही तो अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. दरम्यान, विधानसभेची नियमावली आणि न्यायालयाच्या आदेशांचा हवाला देताना आपला राजीनामा तत्काळ मंजूर न केल्यामुळे त्यांनी संशय व्यक्त केला आहे. ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यांचा कार्यक्रम जाहीर होताना आपला राजीनामा मंजूर करुन काटोलमध्ये विधानसभा पोटनिवडणूक घ्यायला हवी होती, असे त्यांनी म्हटले आहे.

वेगळ्या विदर्भाची पुन्हा एकदा मागणी करताना देशमुख म्हणाले, गडकरी यांनी विदर्भाला धोका दिला आहे. केंद्र आणि राज्यात भाजपाचे सरकार असतानाही भाजपा स्वतंत्र्य विदर्भाबाबत बोलत नाही. भाजपाने वेगळे विदर्भ राज्य निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. भाजपाने विदर्भाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हलबा समाजाला दिलेले अश्वासनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. त्याचबरोबर नागपूरमधील अल्पसंख्यांक आणि दलित समाजातही मोठा रोष आहे. त्यामुळे नागपूरची जागा भाजपा आणि गडकरींसाठी अडचणीची आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभेसाठी सुरक्षित मतदारसंघ शोधायला हवा, अशी टिपण्णीही त्यांनी केली आहे.

त्याचबरोबर विधानसभेऐवजी केंद्राच्या राजकारणात आपल्याला रुची असल्याचे सांगत विदर्भातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास आपण तयार असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय विचारांबरोबर आपण काँग्रेसच्या जवळ आहोत. आपली राजकारणाची दिशा निश्चित आहे. त्यामुळे लवकरच आपण काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पत्र लिहून नाराज आमदारांचे मत विचारणार 
भाजपाचे अनेक आमदार पक्षात नाराज असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. राजीनाम्यानंतर या आमदारांनी आपल्याला फोन करुन समर्थन दर्शवले आहे. त्यामुळे लवकरच आपण भाजपा आमदारांना पत्र लिहून त्यांच्या असंतोषाचे कारण विचारणार आहोत, असेही देशमुख यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 6, 2018 5:44 pm

Web Title: ashish deshmukh will contest against gadkari if he gets chance
Next Stories
1 Nalasopara Explosive Case : अमोल काळे, अमित बद्दी, गणेश मिस्त्रे यांना एटीएसची कोठडी
2 माजी न्यायाधीश कोळसे पाटील यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप
3 अर्नाळा पोलीस ठाणे परिसरात आढळलेली ती वस्तू टाइम बॉम्ब नाही!
Just Now!
X