नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नांदगाव : तालुक्यातील बोलठाण येथील डॉ. देवेंद्र आहेर यांच्यावर एकाने हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. आहेर जखमी झाले असून त्यांना मालेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदगाव तालुका फॅमिली फिजिशियन असोसिएशनने या हल्ल्याचा निषेध केला असून हल्लेखोराविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

बोलठाण येथे डॉ. देवेंद्र आहेर हे पत्नीसह वैद्यकीय व्यवसाय करतात. बोलठाण येथे त्यांचा दवाखाना आहे. रात्री सव्वा दहाच्या सुमारास बोलठाण येथील विजय पवार याने डॉक्टरांना दूरध्वनीवरून लहान बाळ दवाखान्यात आणले असल्याने तुम्ही लवकर या, असे सांगितले. डॉक्टरांनी पाच ते दहा मिनिटात येतो, असे सांगितले. त्यामुळे विजयने दूरध्वनीवरूनच शिवीगाळ सुरू केली.

डॉ. आहेर यांनी त्वरीत दवाखाना गाठला. दवाखाना उघडत बाळ कुठे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी विजयने डॉक्टरांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दवाखान्यातील सहायक हर्षल साबळे आणि डॉक्टरांची पत्नीही तिथे आली. त्या दोघांनाही विजयने शिवीगाळ केली. ‘तुला मारूनच टाकतो’ अशी धमकी देत खिशातून चाकूसारखे हत्यार काढून डॉक्टरांवर वार केला. डॉक्टरांनी हात पुढे केल्याने हातावर तो वार बसला. विजय जीवे मारण्याची धमकी देवून निघून गेला, असे तक्रारीत म्हटले आहे.

स्थानिक रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात डॉ. आहेर यांना दाखल करण्यात आले.

संशयित विजय पवारविरुद्ध नांदगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.