23 November 2017

News Flash

पत्नीनेच दिली होती बँक अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी

गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्या हत्येचा कट रचला जात होता.

औरंगाबाद | Updated: September 10, 2017 2:50 PM

Jitendra holkar : काल पहाटेच्या सुमारास जितेंद्र होळकर जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले.

औरंगाबादमधील बँक अधिकारी जितेंद्र होळकर यांच्या हत्याप्रकरणात एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. जितेंद्र होळकर यांची पत्नी भाग्यश्री होळकर हिनेच या हत्येची सुपारी दिली होती. चारित्र्यावर सातत्याने संशय घेत असल्यामुळेच जितेंद्र यांची हत्या घडवून आणल्याचे कबुली भाग्यश्री होळकरने पोलिसांसमोर दिली आहे.

औरंगाबाद जिल्हयातील शेकटा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक असणाऱ्या जितेंद्र होळकर यांची शुक्रवारी मध्यरात्री हत्या करण्यात आली होती. काल पहाटेच्या सुमारास जितेंद्र होळकर त्यांच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून घाबरलेल्या होळकर कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना याबाबत कळवले होते. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मारेकऱ्यांनी जितेंद्र होळकर यांना खुर्चीवर बसवून, त्यांचे हातपाय बांधून त्यांना ठार मारले होते. त्यांच्या उजव्या हाताचे बोट कापण्यात आले होते. मारेकऱ्यांनी गच्चीवरून घरात प्रवेश केला असावा, असा संशयही पोलिसांना होता. मात्र, हत्येमागील कारण स्पष्ट होत नसल्यामुळे पोलिसांच्या तपासाची दिशा निश्चित होत नव्हती. मात्र, त्यानंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी या प्रकरणातील धागेदोरे उलगडत मारेकऱ्यांना आणि हत्येच्या सूत्रधाराला जेरबंद केले.

होळकर यांच्या पत्नीने औरंगाबादमधील शिवसेनेचा कार्यकर्ता असलेल्या किरण गणोरे याच्याकरवी फैय्याझ आणि बाबू (रा. जुनाबाजार) यांना जितेंद्र होळकर यांची हत्या करण्यासाठी दोन लाख रूपयांची सुपारी दिली होती. गेल्या दीड महिन्यापासून त्यांच्या हत्येचा कट रचला जात होता. त्यासाठी भाग्यश्रीने फैय्याझ आणि बाबू यांना दोन लाखांपैकी दहा हजार रूपये अॅडव्हान्स म्हणून दिले होते. उर्वरित एक लाख ९० हजार रुपये रक्कम अद्याप दिलेली नव्हती. मात्र, ही रक्कम मारेकऱ्यांना देण्यापूर्वीच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी किरण गणोरेला ताब्यात घेतले.

First Published on September 10, 2017 1:17 pm

Web Title: aurangabad bank manager jitendra holkar killing contract given by his wife shivsena leader involved in case