दंगल नियंत्रणात अपयशापाठोपाठ उपायुक्तांविरोधातील गुन्ह्यमुळे नाचक्की

( बिपीन देशपांडे )औरंगाबाद : औरंगाबादचा पोलीस विभाग गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत येत आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. औरंगाबाद परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकूणच राज्यातील पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. गंभीर बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन करतो म्हणून घरी बोलावून श्रीरामे यांनी हा गुन्हा केल्याचा आरोप आहे. शिवाय गुन्हा दाखल करू नये, यासाठी दोन पोलीस निरीक्षकांकडून पीडितेवर दबाव आणल्याचा आरोप तिने केलेल्या तक्रारीत नमूद केला आहे. विशेष म्हणजे पीडित तरुणी ही विभागातीलच एका महिला पोलिसाची मुलगी आहे. पोलिसांचीच मुले सुरक्षित नाहीत तर इतरांचे काय, असा संदेश या घटनेतून नागरिकांमध्ये गेला आहे. शहरातील वाढते घरफोडय़ांचे प्रमाण, वाहनचोरीच्या घटना, यामुळे औरंगाबाद पोलीस विभागाची लक्तरेच वेशीवर टांगली गेली आहेत.

या वर्षांच्या सुरुवातीलाच भीमा-कोरेगावमध्ये झालेल्या दंगलीचे पडसाद औरंगाबादमध्ये उमटले होते. त्यातून औरंगाबादेत उसळलेल्या दंगलीत पोलिसांकडून झालेली मारहाण, धरपकड यावर प्रश्नचिन्ह उभे केले गेले होते. या घटनेनंतर ७ मार्च रोजी कचरा प्रश्नावरून मिटमिटा गावाजवळही पुन्हा एक दंगल उसळली. या दंगलीतही पोलिसांनी घरात शिरून मारहाण केल्याचा व काही तरुणांना त्यांची परीक्षा सुरू असतानाही अटक केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या घटनेचे पडसाद विधिमंडळातही उमटल्यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. या प्रकरणात चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आयुक्त यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्यानंतर पुढील दोन महिने औरंगाबादला पोलीस आयुक्त मिळाला नाही. दरम्यान, मिटमिटातील दंगलीच्या चौकशीचे काय झाले, ती गुंडाळली की काय, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. अखेर चिरंजीव प्रसाद यांच्या रूपाने पोलीस आयुक्त मिळाले. त्यांच्या कामाच्या पद्धतीतून सर्वसामान्य माणूस, माध्यमे दूर ठेवली जात असून शहराचे, नागरिकांचे अनेक प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याचा सूर उमटतो आहे.

पोलीस महासंचालक येणार असल्याची वर्दी मिळाल्यानंतर पोलिसांनी गेल्या १५ दिवसांपासून ज्याची चर्चा शहरात सुरू होती त्या पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामेंविरुद्ध बुधवारीच बलात्काराचा गुन्हा दाखल करून घेतला. पीडितेने पोलीस तक्रार दाखल करून घेत नसल्याचे पाहून पोलीस आयुक्तांच्या व्हॉटसअप ग्रुपवर तक्रार केली. त्यालाही पाच दिवस उलटून गेले होते. पीडित तरुणी ही महिला पोलीस कर्मचाऱ्याचीच मुलगी असून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. त्याबाबत मार्गदर्शन करू, असे सांगून पोलीस उपायुक्त श्रीरामे यांनी तिच्यावर तीन महिने बलात्कार केल्याचा आरोप आहे. तिने पोलिसांत तक्रार दाखल करू नये, यासाठी पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती व शिवाजी कांबळे यांनी दबाव आणल्याचाही आरोप पीडितेने केला आहे. यातूनही पोलीस विभागाची बदनामीच झाली आहे.

शहरात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ

औरंगाबाद शहरात घरफोडय़ांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनचोरीचेही तसेच आहे. शहरात वर्षभरात एक हजार दुचाकी चोरीला जातात. एका मंगळसूत्र चोरापुढे तर पोलीसही हतबल झाले आहेत. शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही सुरू असतानाही वाहनचोर, घरफोडी करणारे, मंगळसूत्र चोर सापडत नाहीत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

पोलिसांमुळे दंगल घडल्याचा आरोप

औरंगाबादेत मध्यंतरी दोन गटांतील किरकोळ वादातून मोठा हिंसाचार उसळला होता. दीडशेपेक्षा अधिक मालमत्तांचे, वाहनांची जाळपोळ झाली होती. या जाळपोळीत बन्सिले नामक ज्येष्ठ व्यक्तीचा तर एका मुलाचा गोळीबारात मृत्यू झाला होता. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर हे यामध्ये गंभीर जखमी झाले होते. हिंसाचार पसरण्यास पोलीसच कारणीभूत असल्याचा आरोप त्यावेळी झाला. चार दिवसांपूर्वी हिंसाचारातील घटनेनंतर जामिनावर सुटलेल्या सहा तरुणांना पुन्हा दुसऱ्या गुन्ह्य़ात अटक केल्याच्या पाश्र्वभूमीवर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी सिटी चौक पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. पोलिसांकडून शंभर-दोनशे रुपयांमुळे हातगाडय़ा, लहान व्यावसायिकांना होत असलेल्या त्रासामुळे हिंसाचार उसळल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावेळी जमलेल्या दीड ते दोन हजार जणांच्या समुदायाने हातात पैसे घेऊन ते पोलिसांना देण्याची तयारी दाखवली होती. यातून औरंगाबादच्या पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे.