अवनी या वाघिणीची शिकार झाल्यानंतर तिच्या दोन बछड्यांची चर्चा सुरु होती. या दोनपैकी एका बछड्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे. सी१ आणि सी२ अशी या दोन बछड्यांची नावं असून त्यातील मादी बछड्याला यवतमाळच्या जंगलातून जेरबंद करण्यात आलं. या बछड्याची रवानगी नागपूरच्या गोरेवाडाला करण्यात आली आहे असेही समजते आहे. तर दुसऱ्या बछड्याचा शोध वनविभागाकडून सुरु आहे असेही समजते आहे.

अवनी या टी१ वाघिणीची नोव्हेंबर महिन्यात शिकार करण्यात आली होती. या शिकारीनंतर देशात आणि राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. याप्रकरणी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे असेही म्हटले होते. चौकशी झाल्यानंतर अवनी या वाघिणीची शिकार नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचीही बाब समोर आली होती. या वाघिणीच्या शिकारीनंतर तिच्या दोन बछड्यांचे काय? असा प्रश्न विचारला जात होता त्यापैकी एका बछड्याला वनविभागाने जेरबंद केले आहे.

अवनी वाघिणीच्या या दोन बछड्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम राबवण्यात आली. कान्हा अभयारण्यातील शिवा, चंचलकली, हिमालय आणि पवनपुत्र या हत्तींना आणले गेले होते. या पथकासोबत पशुवैद्यकीय अधिकारीही सहभागी झाले होते. न्यूज १८ लोकमतने या संदर्भातले वृत्त दिले आहे. दरम्यान अंजी परिसरात वनाधिकारी आणि कर्मचारी यांना वगळता कोणालाही जाण्याच मज्जाव करण्यात आला. अखेर या मोहिमेला यश मिळालं असून एका बछड्याला जेरबंद करण्यात यश आलं आहे.