उच्चाधिकार मंत्रिगटाचे सदस्य आणि सुकाणू समितीच्या बैठकीत वादावादी झाल्याचे समोर आले आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार बच्चू कडू यांच्यात वादावादी झाल्याची बातमी समोर आली आहे. आज दुपारी १ वाजल्यापासून सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरू आहे. ही बैठक वादळी ठरण्याची चिन्हे वाटतच होती आणि अपेक्षेप्रमाणे तसे घडलेही आहे.

आंदोलक शेतकऱ्यांवरचे गुन्हे मागे घ्या अशी मागणी आज झालेल्या बैठकीत करण्यात आली. ज्यावर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सगळे गुन्हे मागे घेणे शक्य नाही असे वक्तव्य केले. ज्यानंतर आमदार बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले. बच्चू कडू आणि चंद्रकांत पाटील दोघेही उभे राहून तावातावाने बोलू लागले. सुकाणू समितीच्या काही सदस्यांनी बच्चू कडू साथही दिली. ज्यानंतर चंद्रकांत पाटील आणि बच्चू कडू यांच्यात वाद आणखी पेटला. त्यानंतर  मात्र बैठकीतल्या इतर सदस्यांनी दोघांनाही शांत केले.

शेतकऱ्यांची कर्जमाफी, आंदोलक शेतकऱ्यांचे गुन्हे मागे घेणे, स्वामिनाथन आयोग लागू करणे या आणि इतर मागण्या सुकाणू समितीने मंत्रिगटाच्या सदस्यांसमोर ठेवल्या आहेत. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर १३ जूनला रेल रोको आंदोलन करू असा इशारा कडू यांनी दिला आहे. तसेच आज होणाऱ्या बैठकीवर शेतकरी आंदोलनाची दिशा ठरणार आहे असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. आता या बैठकीत नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इतकेच नाहीतर गेल्या तीन तासांपासून सुरू असलेल्या बैठकीत वादळी चर्चा सुरू आहे. हेच थोड्यावेळापूर्वी झालेल्या कडू-पाटील वादावरून समोर येते आहे. सरकारने जर आज सुकाणू समितीच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मात्र शेतकरी आंदोलन चांगलेच चिघळण्याची शक्यता आहे.  सरकारने आमचा अंत पाहू नये. शेतकऱ्याला कर्जमाफी द्यावी आज झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही तर शेतकऱ्याचा आक्रोश सरकारला राज्यभर बघायला मिळेल असा इशारा बच्चू कडू यांनी बैठकीला जाण्यापूर्वीच दिला होता.