पिढय़ान् पिढय़ा चालत आलेली वैदू समाजाची, देशातील मुख्य जातपंचायत रविवारी श्रीरामपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने पंचांनी काठी आपटून बरखास्त केली. त्यांनी न्यायनिवाडा करताना वापरलेली काठी बाजूला सारून भारतीय संविधानाची प्रतिज्ञा घेतली. अमानुष व क्रूर ठरलेली जातपंचायत बंद करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत-मूठमाती अभियानाच्या कार्यकर्त्यांनी दीड वर्षे केलेल्या प्रयत्नाला अशा प्रकारे यश आले.
भटक्या वैदू समाजाच्या जातपंचायतीचे श्रीरामपूर मुख्य केंद्र होते. वैदूंचे मुख्य पंच चंदर बापू दासरजोगी तसेच अन्य पंच हे मढीच्या वैदू जातपंचायतीचे पंच होते. मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक तसेच राज्यभरातून मढी येथे वैदू समाज जातपंचायतीसाठी येत असत. पण यंदा जातपंचायत मढीलाही भरविण्यात आली नाही. अंनिसने त्यासाठी प्रयत्न केले होते. मल्लू िशदे व नगरसेवक शामिलग िशदे दीड वर्षांपासून वैदूंचे पंच व पाटलांचे मन वळवत होते. त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
जातपंचायत बंद करून आता भारतीय संविधानानुसार कायद्याचे निर्णय समाजात व्हावे, आधुनिक व प्रगत समाजात जातपंचायत कालबाह्य़ झाली असून ती कायद्याच्या विरोधात आहे. याची जाणीव अंनिसच्या प्रबोधनामुळे झाली. त्यामुळे आम्ही जातपंचायत बरखास्त करीत आहोत. यापुढे शैक्षणिक व सामाजिक विकासास प्राधान्य देऊन वैदूंची प्रगती व विकास केला जाईल. अनिष्ट रूढी व परंपरांना फाटा देऊन मुख्य प्रवाहात सामील होऊ. संविधानाच्या चौकटीत राहून आपले आचरण व विचारात बदल करू, अशी प्रतिज्ञा सर्वानी सरकारी विश्रामगृहानजीक झालेल्या बैठकीत, अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केली. यापुढे राज्यातील वैदू समाजाने जातपंचायत भरवू नये. तसेच कुठे जातपंचायत भरली तर ती आम्ही बंद पाडण्यास मदत करू. स्त्रियांचा, मुलांचा सन्मान करू. त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करू, असा निर्धारही या वेळी व्यक्त करण्यात आला.
अंनिसचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वर्षांपूर्वी नाशिक येथे जातपंचायत मूठमाती अभियान सुरू करण्यात आले होते. जातपंचायती अत्यंत अमानुष, क्रूर व महिलांचे शोषण करणाऱ्या आहेत, वैदू समाजाची मुख्य जातपंचायत बरखास्त झाल्याने शोषण थांबणार आहे.
– अ‍ॅड. रंजना गवांदे, जिल्हा कार्याध्यक्ष, अंनिस

राज्यात ४२ भटक्या जाती व शेकडो उपजाती आहेत. नगरची पद्मशाली, चंद्रपूरची आदिवासी गौड, सांगलीची डोंबारी कोल्हाटी, नाशिकची भटके जोशी व नंदीवाले यांच्या जातपंचायती बंद झाल्या आहेत. आता वैदूंची जातपंचायत बंद झाली. जातपंचायतीविरुद्ध सरकार तीन महिन्यांत कायदा करणार आहे. त्याचा मसुदा समिती येत्या महिनाभरात सादर करील. जातपंचायतीविरुद्ध लोकप्रबोधन, आंदोलन व कायदेशीर लढाईला न्याय मिळत आहे.
– कृष्णा चांदगुडे, संयोजक, जात पंचायत मूठमाती अभियान

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून वैदू समाजाची मुख्य जातपंचायत बरखास्त करण्याचा निर्णय रविवारी श्रीरामपूरमध्ये घेण्यात आला. मुख्य पंच व अन्य पंचांनी जातपंचायतीला मूठमाती देत भारतीय संविधानाची प्रतिज्ञा हाती घेतली. या वेळी अंनिसचे अ‍ॅड. रंजना गवांदे, कृष्णा चांदगुडे, असिफ शेख, मल्लू शिंदे, शामलिंग शिंदे आदी उपस्थित होते.