सन २००८मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपासंदर्भात मनसेचे नेते राज ठाकरे शुक्रवारी शिराळा येथील न्यायालयात उपस्थित राहिले. न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर केला. कल्याण येथे सन २००८ मध्ये झालेल्या सभेवेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते. त्या वेळी त्यांना अटक झाली होती. त्याचे पडसाद राज्यात उमटले होते. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. या प्रकरणी कोकरूड पोलीस ठाण्यामध्ये राज ठाकरे, आमदार शिरीष पारकर, मनसेचे उपजिल्हाप्रमुख तानाजी चव्हाण यांच्यासह आठ जणांवर सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक ठिकाणी तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी शिराळा येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. तानाजी चव्हाण यांच्यासह अन्य सहा जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. राज ठाकरे यावेळी न्यायालयात उपस्थित होते.