News Flash

‘त्या’ वादावर बालभारतीचा खुलासा; “कुर्बान हुसेन यांचा उल्लेख चुकीने करण्यात आला हे म्हणणं संयुक्तिक नाही”

"या पाठातून कोणत्याही प्रकारची सामाजिक भावना दुखावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही"

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांनी दिलेल्या हौतात्म्याचा स्मरण नेहमीचं केलं जातं. मात्र, या तिन्ही हुतात्माची नाव बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकातील एका उल्लेखावरून पुन्हा चर्चेत आली आहे. बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात सुखेदव यांच्या ऐवजी कुर्बान हुसेन फासावर गेले असा उल्लेख आला आहे. भगतसिंग, राजगुरु यांच्यासह फासावर गेलेल्या तिसऱ्या क्रांतिकारकाच्या नावात झालेल्या चुकीवर ब्राह्मण महासंघानं आक्षेप घेतला होता. त्यावर बालभारतीनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकातील एका पाठावरून निर्माण झालेल्या वादावर बालभारतीकडून सविस्तर खुलासा करण्यात आला आहे. “मराठी बालभारती हे पाठ्यपुस्तक शालेय वर्ष २०१८-१९मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. सदर पाठ्यपुस्तक हे मराठी भाषा विषयाचे इयत्ता आठवीचे पाठ्यपुस्तक असून, त्यामध्ये भाषा विषय पाठ्यपुस्तक निर्मितीच्या प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे नामवंत साहित्यीक, कवी, लेखक यांचे लेख, कविता यांचा समावेश आहे. उपरोक्त पाठ्यपुस्तकामध्ये पाठ क्र. २ माझ्या देशावर माझे प्रेम आहे समाविष्ट आहे. हा पाठ महाराष्ट्रातील नामवंत लेखक, साहित्यीक, विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, संपादक यदुनाथ थत्ते यांच्या ‘प्रतिज्ञा पाठ्यपुस्तकातील’ या पुस्तकातील प्रकरण क्र. ३ ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ यामधू घेतलेला आहे. त्यामध्ये शालेय पाठ्यपुस्तकात देण्यात आलेल्या प्रतिज्ञेच्या ‘माझ्या देशावर माझे प्रेम आहे’ या तिसऱ्या वाक्याच्या अनुषंगानं राष्ट्रप्रेम भावनेबद्दलचा आशय हा विद्यार्थी व शिक्षक यांच्या आंतरक्रियेतून स्पष्ट करण्यात आलेला आहे. या पाठामध्ये क्रांतिकारकांबाबतची माहिती अभिप्रेत नाही. देशप्रेम भावना जाणीवजागृती बाबत वर्गातील विद्यार्थ्यांशी झालेली आंतरक्रिया या पाठातून लेखकानं मांडलेली आहे. ती मूळ पुस्तकात जशी मांडलेली आहे तशीच घेण्यात आली आहे. त्यामुळे कुर्बान हुसेन या नावाचा उल्लेख चुकीनं करण्यात आला आहे, हे म्हणणे संयुक्तिक नाही. त्यामुळे या पाठातून कोणत्याही प्रकारची सामाजिक भावना दुखावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही,” असं बालभारतीनं म्हटलं आहे.

“भाषा विषय पाठ्यपुस्तकांच्या संदर्भात पाठ्यपुस्तकांमधील पाठ, कविता या मराठी भाषा विषय समिती व अभ्यासगटाकडून निवडण्यात येतात. त्यासाठी संबंधित भाषा विषयातील नामवंत साहित्यीक, लेखक व कवी यांचे साहित्य हे अभ्यासक्रमाची गरज, उद्दिष्ट्ये अभ्यासून तसेच साहित्याची योग्य ती पडताळणी करून विचारात घेतले जाते. मूळ साहित्यामध्ये व त्यातील आशयामध्ये बदल करण्याचा अधिकार समितीस असत नाही,” असं बालभारतीनं स्पष्ट केलं आहे.

“उपरोक्त विषयाच्या अनुषंगानं कर्बान हुसेन यांचे क्रांतिकारक म्हणून समाविष्ट केलेले नाव योग्य आहे. कारण कुर्बान हुसेन हे सोलापूरमधील स्वातंत्र्य सैनिक/सत्याग्रही होते. त्यांना दिनांक १२ जानेवारी १९३१ रोजी सहकाऱ्यांसमवेत फाशी देण्यात आली होती. त्यामुळे एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून ते सर्वपरिचित आहेत. याबाबतची माहिती महाराष्ट्र शासनाच्या सोलापूर जिल्हा संकेतस्थळावर सुद्धा देण्यात आली आहे. पाठ्यपुस्तक मंडळाच्या इतिहास इयत्ता आठवी या पाठ्यपुस्तकामध्येही पाठ क्र. ८ सविनय कायदेभंगमध्ये सोलापूर सत्याग्रहाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये कुर्बान हुसेन यांचे कार्य नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर या पाठ्यपुस्तकात पाठ क्र. १० सशस्त्र क्रांतिकारी चळवळमध्ये भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या कार्याचा उल्लेख करण्यात आला आहे. वरील प्रमाणे वस्तुस्थिती लक्षात घेता, क्रांतिकारक सुखदेव यांचे नाव पाठ्यपुस्तक मंडळाने वगळले म्हणणे ही बाब खरी नाही,” असं बालभारतीनं म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 7:15 pm

Web Title: balbharti clarification on 8th standard chapter dispute bmh 90
Next Stories
1 “टाळेबंदीच्या कालावधीतील गरीबांची वीज बिले त्वरित माफ करा, अन्यथा…”
2 “…तर तुम्ही शांत बसलेलंच अधिक योग्य राहील”; रोहित पवारांचा भाजपा नेत्याला टोला
3 सोलापुरात कडक संचारबंदी; जनतेचा उत्तम प्रतिसाद
Just Now!
X