पंढरपूर, कळंब पालिकेकडून वसुली

सोलापूर : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेचा हिस्सा न भरल्यामुळे सोलापूरच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त पुरूषोत्तम मीना यांनी सहा नगरपालिकांचे बँक खाते गोठविले आहे. यात दुधनी, कुर्डूवाडी, सांगोला, पंढरपूर, तसेच उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब व परांडा या नगरपालिकांचा समावेश आहे.

सोलापूर, उस्मानाबाद व लातूर या तीन जिल्ह्य़ांतील २१ नगरपालिका व दोन महापालिकांच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) योजनेचा लाभ मिळण्यासाठी सोलापुरातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी क्षेत्रीय आयुक्त कार्यालयामार्फत नियंत्रण ठेवले जाते. हा कायदा नगरपालिका व महापालिकांच्या कर्मचारी व कामगारांना लागू आहे. कंत्राटदार, ठेकेदार व मुकादमामार्फत होणाऱ्या कामासाठी नियुक्त कामगारांसाठीही हा कायदा लागू आहे. परंतु कोणत्याही पालिकांनी अशा कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्यामुळे सर्व २३ पालिकांविरूध्द कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) कायद्यातील तरतुदीनुसार न्यायिक चौकशीची प्रक्रिया राबविण्यात आली होती.

यासंदर्भात मागील वर्षांपासून सर्व नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दोनवेळा बैठकाही घेण्यात आल्या होत्या. या बैठकांमध्ये क्षेत्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आयुक्त डॉ. हेमंत तिरपुडे यांनी ईपीएफ कायद्याच्या तरतुदी, पालिका, कंत्राटदार तथा ठेकेदारांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या, चौकशांमध्ये सादर करावे लागणारे दस्तऐवज, माहिती, ईपीएफ कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याला देण्यात आलेले न्यायिक अधिकार, निश्चित केलेल्या ईपीएफच्या देय रकमा न भरण्याचे परिणाम आणि वसुली अधिकाऱ्याला कायद्याने देण्यात आलेले अधिकार यासंदर्भात जाणीव करून दिली होती. आतापर्यंत २३ पैकी ६ नगरपालिकांची चौकशी पूर्ण झाली आहे. यात या नगरपालिकांवर कंत्राटी कामगारांची भविष्य निर्वाह निधीची देय रक्कम निश्चित करण्यात आली आहे. यात सर्वाधिक एक कोटी ३० लाख २२ हजार ५९८ रुपयांची थकबाकी उस्मानाबाद जिल्ह्य़ातील परांडा नगरपालिकेकडे आहे. सांगोला-५६ लाख ६१ हजार ६४७ रुपये, पंढरपूर-३० लाख ९२ हजार ७१४ रुपये, दुधनी (अक्कलकोट)-१७ लाख ८० हजार ७९० रुपये, कुर्डूवाडी-१२ लाख ६८५२ आणि कळंब (उस्मानाबाद)-तीन लाख ४३ हजार ६४९ रुपये याप्रमाणे ईपीएफ देय रकमेची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल होण्यासाठी सर्व नगरपालिकांचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. एक कोटी ३० लाख २२ हजारांची ईपीएफ देय रक्कम थकीत असलेल्या परांडा नगरपालिकेच्या सहा बँक खात्यांतील ७९ लाख १७ हजार ९२० रुपये इतकी रक्कम गोठविण्यात आली आहे. तर पंढरपूर व कळंब या दोन्ही नगरपालिकांच्या बँक खाते गोठविण्यात आल्यानंतर संपूर्ण थकीत रक्कम वसूल करण्यात आली आहे.