सोशल मीडियातून बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत अफवा पसरवणाऱ्यांविरोधात ‘बँक ऑफ महाराष्ट्र’कडून पुणे सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली आहे. बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आली असल्याबाबत वृत्त पसरविणाऱ्या सर्व बातम्यांचे संकेतस्थळ आणि संबंधित ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप खात्यांची माहिती तक्रारीच्या माध्यमातून पोलिस अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी बँकेने पुणे सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज गुरूवारी दिला.

पीएमसी बँकेची आर्थिक स्थिती डबघाईला आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून समाजमाध्यमात बँक ऑफ महाराष्ट्रबाबत खोडसाळपणे दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असून, हे वृत्त खोडसाळपणे प्रसारित करण्यात आल्याचे बँकेने दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे. या चुकीच्या महितीच्या मूळ स्रोताचा शोध घ्यावा आणि या कृत्यासाठी जबाबदार व्यक्तींच्या विरोधात कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी विनंती बँकेमार्फत तपास यंत्रणांना करण्यात आली आहे.

‘बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाबतीत अदृश्य वाईट हेतूनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमुळे सर्वसामान्य जनतेमध्ये गैरसमजाचे वातावरण निर्माण होऊ शकते. समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेले वृत्त कदापीही खरे नाही तसेच वास्तविकता न जाणून घेता यामध्ये निष्कर्ष काढले गेले आहेत. पूर्वीचा म्हणजे आधी झालेला तोटा आणि लेखा आपल्या राखीव ठेवींमधून समायोजित करण्यासाठी बँकेने रिझव्‍‌र्ह बँकेकडे संपर्क साधला आहे. अर्थात असे जरी बँकेने अद्याप केले नसले तरी बँकेची आर्थिक स्थिती स्थिर, अखंडित आणि मजबूतच असेल. फसवणुकीच्या संबंधित वृत्तात बँक ऑफ महाराष्ट्रच्या सहभागीत्वाचे उल्लेख केलेले आकडे भ्रामक आणि चुकीचे आहेत. स्थावर मालमत्ता कंपन्यांना दिलेल्या कर्जामध्ये बँकेचे कर्ज कमी प्रमाणात असून यामुळे बँकेच्या ताळेबंदावर आणि नफ्यावर कमी परिणाम होईल’, असेही बँकेने नमूद केले आहे.