रोज चार, पाच तास वीज गायब असल्याने घराला कोंडवाडय़ाचे स्वरूप

प्रसेनजीत इंगळे, लोकसत्ता

विरार : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीचा फास सामन्यांच्या जीवाशी अधिकच घट्ट होता चालला आहे. १४ एप्रिल रोजी टाळेबंदी उठेल आणि जनजीवन सामान्य होईल आणि पोटभर जेवण मिळेल, नाहीतर गावी तरी जाता येईल, या आशेवर अनेकांनी उपासमारी आणि आर्थिक कोंडी सहन केली. मात्र, आता टाळेबंदी अधिक वाढवल्याने नालासोपाऱ्यातील हजारो मजुरांसाठी करोनापेक्षा जगण्याची लढाई मोठी झाली आहे.

अत्यावश्यक सेवेतील वस्तू तर सोडाच पण इतरही समस्या अधिकच जटील होत असल्याने आता जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ही व्यथा आहे नालासोपारा येथील गावराई पाडा येथील स्लम विभागातील येथे नागरिक आता करोनाला नाही तर जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सेवांसाठी डाहो फोडत आहेत. कारण या परिसरात हजारो कुटुंब बैठय़ा चाळीत, दुकानाच्या गाळ्यात, पत्र्याच्या शेड मध्ये राहतात. सध्या या परिसरात टाळेबंदीमुळे अनेक समस्यांनी जन्म घेतला आहे, यामुळे येथील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या परिसरात राहणारे नागरिक हे बहुतांश नागरिक हे मजूर आहेत अथवा छोटा मोठा धंदा करून हातावर पोट ठेऊन भाकरीची लढाई लढत आहेत. पण सध्या या परिसरात पिण्यासाठी पाणी नाही, शौचालय नाही, दवाखाने नाहीत, सफाई होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच टाळेबंदीत हाताचे काम नसल्याने घरात अन्नाचा दाणा नाही. स्थानिक रेशन कार्ड नसल्याने प्रशासन किराणा देत नाही. केवळ समाजसेवी संस्था आणि प्रशासनाच्या अन्नछत्रातून येणाऱ्या  खिचडीवर उदरनिर्वाह सुरू आहे. पण तेही मिळविण्यासाठी घराबाहेर जावे लागते तर बाहेर पोलिसांचे दंडुके खावे लागतात. त्यातही मिळणााऱ्या जेवणातून कुटुंबातील ५ ते ६ जणांचे पोट कसे भरायचे. याहून बिकट परिस्थिती लहान मुलांची आहे. यामुळे अनेकवेळा आईवडिलांना उपाशी राहून मुलांचे पोट भरावे लागत आहे.

या परिसरातील सर्वच घरावर पत्रे आहेत. बाहेर वाढता उन्हाचा पारा घरात थांबू देत नाही. येथील स्थानिक रहिवाशी मंगल दुबे यांनी सांगितले दिवसा घरात इतके गरम होते की, बसता सुद्धा येत नाही त्यात लहान मुले उकाडय़ाने आजारी पडत आहेत. विभागात एक दोन दवाखाने आहेत पण ते सुद्धा टाळेबंदी लागू झाल्यापासून बंद  असल्याची माहिती कैलाश उपाध्याय यांनी दिली.