एकीकडे राज्यात करोनाचे वाढते रुग्ण आणि मृत्यूदर या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्तरावर स्थानिक प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लादले जात आहेत. बीड जिल्ह्यामध्ये वाढते करोना रुग्ण पाहाता जिल्हा प्रशासनाने २६ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. यामध्ये गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनप्रमाणे पूर्ण बंदचे निर्देश जरी दिले गेले नसले, तरी मोठ्या प्रमाणावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे Beed Lockdown मध्ये सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे. बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.

 

गेल्या आठवड्यात बीडमध्ये १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे बीडमधील करोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावलं उचलण्यात आली. मात्र, यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेतला धनंजय मुंडेंनी बीडचे पालकमंत्री या नात्याने लॉकडाऊनचे निर्बंध सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत शिथिल करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. मात्र, असं करताना त्यांनी नागरिकांना देखील “आपली जबाबदारी ओळखून करोनाविषयक नियमांचं पालन करावं”, असं आवाहन केलं आहे.

निर्बंधांमध्ये मिळालेल्या शिथिलतेमुळे सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीमध्ये व्यापार आणि उद्योगधंदे करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनेक व्यापारी संघटनांनी धनंजय मुंडेंची भेट घेऊन आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आणि जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना सकाळी ७ ते दुपारी १ या कालावधीमध्ये निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्देश दिले.