लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : ‘बिटा कँरोटीन’ द्रव्यामुळे लोणार सरोवरातील पाण्याचा रंग बदलला आहे, असा प्राथमिक अंदाज ‘जिओलॉजीस्ट असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. असोसिएशनच्या चमून शनिवारी लोणार सरोवराला भेट देऊन पाणी व मातीचे नमुने घेतले.
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार येथील खाऱ्या पाण्याचे सरोवर जगातील एक आश्चार्य म्हणून ओळखले जाते. हे जागतिक दर्जाचे बेसॉल्ट खडकापासून बनलेले एकमेव सरोवर आहे.

निळे व हिरवे दिसणारे सरोवरातील पाणी गत काही दिवसांपासून लाल झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे कुतूहल निर्माण झाले असून, आश्चार्य व्यक्त होत आहे. या बदलावर विविध संस्थांकडून संशोधन व अभ्यास करण्यात येत आहे. लोणार सरोवरातील पाणी रंगात झालेल्या बदल्याच्या पाश्र्वाभूमीवर औरंगाबाद येथील जिओलॉजीस्ट असोसिएशनच्या चमूने लोणार सरोवरला शनिवारी भेट दिली. असोसिएशनचे अध्यक्ष योगेश वगदे, सचिव अमित चव्हाण, बुलढाणा जिल्हा समन्वयक अंकूश कानकटाव, वाशीम जिल्हा समन्वयक सागर मोरे व राहुल राठोड यांनी पाहणी करून पाणी व मातीचे नमुने घेतले. या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल प्रशासनाला सादर करणार असल्याचे सांगण्यात आले. भूजलाची तपासणी करण्यासाठी परिसरातील विहिरी व विधंन विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले.

उन्हाळ्यात वाढलेले तापमान, सूर्य प्रकाशाची भरपूर उपलब्धता, पावसाळी किंवा गोड पाण्याचा अभाव या तीन कारणामुळे शेवाळ आपल्या प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये बिटा कँरोटीन नावाचे रंगद्रव्य तयार करतो. त्या रंगद्रव्यामुळे पाण्याचा रंग लालसर झाला आहे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.
पाणी अपायकारक नाही
उष्ण तापमानामुळे शेवाळमध्ये नेहमी होणारी ही प्रक्रिया आहे. यामध्ये घाबरण्याचे कारण नसून, पाणी अपायकारक नाही, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष योगेश वगदे यांनी दिली. ऑस्ट्रेलिया किंवा रशिया आणि मृत समुद्रात असाच प्रकार घडला असल्याचेही ते म्हणाले.