अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणी आता त्यांचा मोबाइल तपासला जाणार आहे. मोबाइलमधील सीडीआर अर्थात कॉल डिटेल रेकॉर्ड तपासण्यात आले असून त्याआधारे त्यांच्या आत्महत्येचे कारण समजण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे भय्यू महाराजांचा मोबाइल हा त्यांचे आत्महत्येचे कारण शोधण्यामागचा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

भय्यू महाराज यांना जे फोन कॉल्स आले त्याच्या सीडीआरवरून तपास सुरु आहे. सीडीआरमध्ये ज्या लोकांनी भय्यू महाराजांशी संवाद साधला आहे, त्यांची माहिती गोळा करण्यात आली आहे. या माहितीच्या आधारे त्यांच्या इतर काही सेवकांचीही चौकशी करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
पन्नास वर्षांच्या भय्यू महाराजांनी १२ जून २०१८ ला त्यांच्या निवासस्थानी स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. हे आत्महत्येचं प्रकरण आहे असं समजून पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर प्रकरण बंद करण्याची तयारी केली होती. मात्र, त्यांचा ड्रायव्हर कैलास पाटील उर्फ भाऊ याला निवेश बडजात्या या वकिलांकडे पाच कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. त्याने चौकशीत अनेक गौप्यस्फोट केले. आश्रमातले काही लोक महाराजांना ब्लॅकमेल करत होते, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली होती.त्यानंतर भय्यूजींचा सेवक पोलिसांसमोर हजर झाल्यामुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं.