भीमा-कोरेगाव येथील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून त्याला राज्यभरात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मागील २ दिवसांपासून या प्रकरणाने राज्यभरात खळबळ माजली आहे. एखादी घटना घडली की सध्या सोशल मीडियाही पेटून उठतो. फेसबुक, व्हॉटसअॅप आणि ट्विटरसारख्या माध्यमांचा वापर करुन वातावरण पेटवण्याचे काम केले जाते. मात्र राज्यभरात काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असताना सोशल मीडियावर मात्र नेटीझन्स संयम दाखवत या प्रकरणाला प्रतिसाद देत असल्याचे दिसते. त्यामुळे सोशल मीडियाचा अशा परिस्थितीत चांगला वापर केला जाऊ शकतो हेच समोर येत आहे.

यासाठी पोलिसांकडून नागरीकांनी कोणत्याही प्रकारचे चुकीचे मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविल्यास त्या व्यक्तीवर कठोर कारवाई होईल असे पोलिसांच्या सायबर सेलकडून सांगण्यात येत आहे. ‘समाजभावना भडकवणाऱ्या पोस्ट्स, अफवा सोशल मीडियावर आणि व्हाट्सऍप सारख्या इतर अँप द्वारे पसरवणाऱ्या समाजकंटक व्यक्तींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’ असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पोलिसांबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल नागरिकांना सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने वापर करु नका असे आवाहन केले होते. याशिवाय अनेक नेते आणि समाजातील जाणकारांकडूनही नागरीकांनी अशा परिस्थितीत शांत रहावे असे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत व्हॉटसअॅप ग्रुप आणि फेसबुकवर जातीचा तिढा सुटायला हवा, विशिष्ट झेंड्यापेक्षा भारताचा झेंड्याला सर्वोच्च मानायला हवे. तसेच इतिहासातील घटनांवर पुढे न जाता योग्य पद्धतीने विचार करुन आपले आणि आपल्या पुढील पिढीचे भविष्य चांगले राहील यासाठी प्रयत्न करायला हवेत. जात-पात विसरुन आपण माणूस म्हणून जगूया असे आवाहनही सोशल मीडियावरुन अनेकांकडून कऱण्यात येत आहे.

सोशल मीडियावर सध्या काही एकता राखण्याच्यादृष्टीने सकारात्मक पोस्ट फीरत असून त्या खालीलप्रमाणे…

प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकानं बोलणं नको, इतिहास उकरणं नको,
कोणाला चूक ठरवत व्देष नको. राजकारण्यांचं ऐकणं नको. माणूसकी सोडणं नको.
——
इतिहासाचा गाळ वाहत येऊन वर्तमानावर साचू लागला की भविष्ये तुंबणारच!
——
ना ब्राम्हण जिंकले ना मराठा ना दलित…
जिंकले फक्त इंग्रज!
२०० वर्षांनंतरही फूट पाडण्यात यशस्वी…
——
ते भगवा निळा हिरव्यावर बोलतील
आपण मात्र तिरंग्यावर अडून राहू